नवी मुंबई: नवी मुंबईतील कोपरखैरणे रेल्वे स्टेशनलगत असलेली झोपडपट्टी महानगरपालिकेने हटवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही झोपडपट्टी एखाद्या भूखंडावर नव्हे तर पदपथावर पसरली होती. सोमवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून ती दिवसभर चालणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.
कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगत आणि बालाजी चित्रपटगृहासमोर सेक्टर-९ येथील सिडकोच्या भूखंडावर मोठी झोपडपट्टी उभी करण्यात आली होती. २०१८ मध्ये सदर भूखंड सिडकोने विकासकाला विकला मात्र विकासकाने झोपडपट्टी हटवल्याशिवाय ताबा घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने सिडकोने मोठी कारवाई करीत झोपड्या हटवल्या आणि तात्काळ विकासकाला भूखंड हस्तांतरण केला. विकासकानेही लगोलग भूखंड सीमेवर तारांचे कुंपण टाकले. त्यामुळे संतप्त झोपडपट्टीवासीयांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस जखमी झाले होते. वातावरण शांत करण्यासाठी येथील झोपड्या पदपथावर गेल्या. त्याला मनपाने विरोध केला नाही. मात्र तेथे या झोपडपट्ट्या वसल्या त्या जणू कायमच्याच. मात्र अतिक्रमण विभागात खांदेपालट होताच काही ठोस कारवाई झाल्या आहेत. त्यात या आजच्या मुख्य कारवाईचा समावेश आहे.
या कारवाईसाठी आठही विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. तसेच सुमारे शंभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी २० ते २५ कामगारांच्या मदतीने दोन जेसीबी मशीनसह सर्व झोपड्या पाडण्यात आल्या. याशिवाय या झोपडपट्टीवासीयांनी हळूहळू सेक्टर-९ रहिवासी गृहसंकुलासमोरील पदपथावर मांडलेली पथारी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत पूर्ण जागा मोकळी करण्यात येईल, अशी कोपरखैरणे अतिक्रमण विभागाने माहिती दिली.