लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात झाडांवर खिळे ठोकून जाहीराती करणाऱ्यांविरोधात उशीरा का होईना प्रशसानाने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात झाडांना खिळे ठोकणे तसेच बेकायदा रोषणाई करणाऱ्याविरोधात १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच झालेल्या ठरावाप्रमाणे शहरातील वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे तसेच वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा नागरिक, संस्था, व्यावसायिकांकडून प्रतिवृक्षा प्रमाणे १० हजार इतका दंड आकारला जाणार आहे. गेल्या काही वर्षात या आघाडीवर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून पुर्णपणे दुर्लक्ष झाले होते. शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळांना काँक्रीटचे आवरण टाकण्यात आले आहे. त्याकडेही महापालिका प्रशासन गांभीर्याने पहात नाही. असे असताना यापुढील काळात झाडांना खिळे ठोकणे, रोषनाई करण्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका सतर्क
नवी मुंबई शहरात १९७ उद्याने असून २५२ रस्ता दुभाजक ,ट्री बेल्ट व मोकळ्या जागा यांचे नैसर्गिक सौंदर्य अधिक वाढवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शहरातील हवा स्वच्छ रहावी यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या काही काळापासून वेगवेगळे प्रयत्न सुरु केले आहेत. अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे. हे करत असताना झाडांना खिळे ठोकून जाहराती लावणे तसेच विद्युत रोषणाई करणे असे प्रकार वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. यापूर्वी वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब तसेच साहित्य संघ मंदिर परिसरातील झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावण्याचा प्रकार समोर आला होता.
दरम्यान, पालिकेने शहरातील विद्युत रोषणाई केलेल्या व खिळे ठोकून जाहिराती लावलेल्यांची पाहणी करावी व दंडाबाबत कारवाईची कडक अंमलबजावणी करावी तरच अशा प्रकारांना आळा बसेल, असे वृक्षप्रेमी आबा रणावरे यांनी सांगितले.
नवी मुंबई शहरात यापुढे झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावणे, झाडांना विद्युत रोषणाई करणे असे प्रकार केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करुन प्रतिझाडामागे १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे.सर्व विभाग अधिकाऱ्यांना कारवाई करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. -किसनराव पलांडे ,उपायुक्त नवी मुंबई महापालिका