संतोष जाधव, लोकसत्ता
नवी मुंबई : आता नवी मुंबई महापालिकेकडून आगामी शैक्षणिक वर्षात सर्वच शाळांमध्ये इंग्रजी नर्सरी सुरू करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. नुकतीच याबाबत नुकतीच पालिकेत केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन आगामी शैक्षणिक वर्षापासून सर्वच शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीने पालिकेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. पालिका अधिकाऱ्यांनीच राजकीय हट्टापायी मायमराठीची गळचेपी सुरू केल्याचे चित्र आहे. यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
महापालिका स्तरावर दरवर्षी मोठ्या गाजावाजा करीत मराठी संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. त्याच पालिकेत मराठीतून शिक्षण संपवण्याची चर्चा सुरु झाली आहे. महापालिका शाळांमध्ये विविध माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. पालिकेच्या सर्व माध्यमांच्या जवळजवळ ५३ शाळा असून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सीबीएसई शाळा अशा एकूण ५३ शाळा आहेत. आगामी काळात वाढत्या इंग्रजीचा प्रभाव पाहता पालिका शाळांमध्येही इंग्रजी नर्सरीच्या शाळा सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
आणखी वाचा-विस्तारित तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सुविधांसाठी ४८३ कोटी
पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी नर्सरीचे वर्ग सुरु करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे मोफत इंग्रजी शिक्षण मिळणार असेल तर कोणते पालक आपल्या मुलांना मराठी इंग्रजी शाळेत घालतील असा प्रश्न आहे. राजकीय हट्टापोटी व पालिका अधिकाऱ्यांच्या मराठीच्या पोकळ मराठीप्रेमामुळे मराठीच्या शाळा आगामी १० वर्षातं बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालिकेतील काही अधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे चित्र आहे. परंतु संपूर्ण व्यवस्थेपुढे मराठी भाषेचा झेंडा फडकवत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निर्णय व्यवस्थेबाहेर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुळातच महाराष्ट्रात मराठी माध्यमांच्या शाळांना चांगले दिवस यावेत व त्यांच्याकडून चांगले शिक्षण द्यावे ही जबाबदारी राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका यांची आहे. परंतू राज्यकर्त्यांच्या व सीबीएसई शाळा सुरु करण्याच्या हट्टापायी राजभाषा मराठीची गळचेपी केली जाते. मराठी भाषेचा व मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यकर्ते व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. उलट दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच इंग्रजी सुरु करण्याचा प्रयत्न म्हणजे पुढील १० वर्षांत पालिका शाळेतील मराठी माध्यमाची कवाडे बंद करण्याचा हा प्रकार असल्याचे बेलले जात आहे. याबाबत शिक्षण उपायुक्त योगेश कडुस्कर यांना संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
आणखी वाचा-धावत्या उरण-नेरुळ लोकलमध्ये महिलेची प्रसूती
तरीही मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा गाजावाजा
नुकत्याच झालेल्या मराठी संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात प्रवीण दवणे यांनी मराठी शाळा बंद पडणे म्हणजे मराठीचा लचका तोडणे अशी खंत व्यक्त केली होती. या कार्यक्रमाला अवघे काही दिवस झाले असतानाच इंग्रजी नर्सरीचे वर्ग सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
महापालिकेकडे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी नर्सरी सुरु करण्याबाबत पालिकेकडे मागणी करण्यात आली होती. परंतू याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. शिक्षण विभागात याबाबत बैठक झाली असेल तर त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल. -राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मराठी माध्यमातील शिक्षण दर्जेदार नसते व इंग्रजी माध्यमातील शिक्षण दर्जेदार असते ही मागील काही वर्षांत जाणीवपूर्वक पसरवलेली अफवा आहे. पालिकेने मराठी शाळांचा दर्जा वाढवावा. पालिकेने इंग्रजीच्या हट्टापेक्षा मराठी शाळांचा दर्जा सुधारावा. -सुधीर दाणी, प्रवर्तक, अलर्ट सिटीझन्स फोरम
अमेरिकेतील मराठी विद्यार्थ्यांसाठी करार
नुकतेच मराठी विश्व संमेलन वाशी येथे पार पडले. मराठीसाठी करोडोंची उधळण झाली. शिक्षणमंत्री यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांना मराठी शिक्षण देण्यासाठी तिथल्या मराठी संस्थेशी सामंजस्य करार केला. तसेच आता उच्च शिक्षणही मराठीतून दिले जाणार असल्याचे जाहीर केले असे असताना पालिकेने सुरु केलेला इंग्रजी नर्सरी सुरू करण्याचा घाट कशासाठी घातला आहे, असा सवाल निर्माण होतो.