लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : पामबीच मार्गालगतच्या सतरा प्लाझा परिसरातील अतिक्रमणांवर बुधवारी सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली. या परिसरातील विविध हॉटेल्स, दुकाने, गॅरेज, बार यांच्याकडून आस्थापनांसमोरील मोकळ्या जागांचा (मार्जिनल स्पेस) गैरवापर करत असल्याने तोडक कारवाई करत एका दिवसात तब्बल ७२ लाख ९८५० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
सतरा प्लाझा परिसरात बेकायदा वाहनतळ व पालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता खेळखंडोबा करून टाकला आहे. पालिका वाहतूक विभाग या प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्षच या मार्गावरील वाहतूक कोंडीला जबाबदार असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-उरण: सिडकोचा घनकचरा प्रकल्प कचऱ्याच्या विळख्यात
पामबीच मार्गावर रस्त्यावरच बेकायदा पार्किंग ही पालिकेची व शहराची डोकेदुखी ठरली आहे. वाशीतील सतरा प्लाझासह शहरातील विविध मॉल व कमर्शिअल पार्कसमोर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. पालिकेने या ठिकाणी सुरुवातीला लोखंडी बॅरिकेट्स लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्याऐवजी भिंत उभारण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला. त्याला येथील दुकानदारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु पार्किंगचा प्रश्न जैसे थे आहे. मुळातच या भागाची पाहणी केली असता सकाळी ९ वाजण्यापूर्वी व रात्री १० नंतर या भागात कोणतीही वाहतूक कोंडी होत नाही. परंतु सकाळी सतरा प्लाझा व या विभागातील कार व इतर सुशोभीकरण व दुरुस्ती दुकाने यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. त्याच्याकडे पालिकेचा अतिक्रमण विभागच दुर्लक्ष करतो. येथील दुकानदारांनी पालिकेने प्रस्तावित केलेल्या संरक्षक भिंत बांधण्याला प्रथम विरोध केला नंतर याचिका मागे घेतली. तर दुसरीकडे वाहतूक विभाग, पालिका यांच्याकडून याच परिसरात अळीमिळी गुपचिळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा-करळ ते जासई दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्याचा दिवसाही लखलखाट
सतरा प्लाझामध्ये विविध प्रकारची दुकाने, कार्यालये आहेत. कोपरीपासून विविध वाहनांच्या खरेदी-विक्रीची व दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग पुन्हा पाहायला मिळत आहे. तुर्भे सेक्टर १९ ई व १९ सी या ठिकाणी नियमानुसार गोदामे आहेत. परंतु व्यावसायिकांनी बेकायदा पामबीच मार्गाच्या बाजूने दुकानांचा प्रवेश सुरू केला आहे. त्यामुळे या परिसरात पामबीच या वेगवान मार्गावरच बेकायदा वाहनतळ आहे. आज अतिक्रमण विभागाने या परिसरातील विविध दुकानांच्या मोकळ्या जागावरील अतिक्रमणांवर तोडक कारवाई केली. आजच्या कारवाईसाठी एकूण ३० पथके तयार करण्यात आली होती.