मांस विक्रेत्यांवर कडक कारवाईचे पालिकेचे आदेश

शहरातील मांसाहारीची गरज भागविताना अनेक ठिकाणी उघडय़ावर शेळ्या-मेंढय़ा, कोंबडी यांची कत्तल केली जात असल्याचे निर्देशनास आल्याने नवी मुंबई पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी अशा मांस विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्रामीण भागात ही कत्तल मोठय़ा प्रमाणात उघडय़ावर सुरू आहे.

नवी मुंबई पालिकेला सिडकोने काही दिवसांपूर्वी सानपाडा येथे कत्तलखान्यासाठी भूखंड अदा केला आहे. मात्र मागील २५ वर्षांत पालिकेचा कत्तलखाना नसल्याने उघडय़ावर प्राण्याची मोठय़ा प्रमाणात कत्तल केली जात आहे. त्यासाठी काही मांस विक्रेत्यांनी गाळे व रुम भाडय़ाने घेतलेल्या आहेत. दुकानासमोर कापडी पडदे लावून ही कत्तल केली जात आहे. बेकायेदशीर बांधकामांमुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी लोकसंख्येपेक्षा जास्त झाली आहे. तेथील मांसाहारीची गरज भागविताना मांस विक्रेते शेळ्या मेंढय़ा आणि कोंबडय़ा यांची सर्रास कत्तल करीत असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे ही कत्तल पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नजरेसमोर होत आहे. काही अधिकारी कर्मचारी तर दर मांस घेण्यासाठी आपल्या या ओळखीचा उपयोगदेखील करीत असल्याचे दिसून येते. पालिकेने यापूर्वी उपायुक्त म्हणून काम करणारे नवी मुंबईकर अतिरिक्त आयुक्त पेंढारी यांनी पदभार घेतल्यानंतर हा पहिला आदेश जारी केला आहे. उघडय़ावर प्राण्यांची कत्तल करणे हा गुन्हा असल्याने त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे उघडय़ावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीला आता तरी पायबंद बसले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्व प्रकारच्या प्राण्याची कत्तल आणि उपचार करण्याची पालिकेने मागणी केल्याप्रमाणे शिरवणे येथे सिडकोने २२ एकर जमीन जाहीर केली आहे. त्याचे शुल्कदेखील भरण्यात आले असून या ठिकाणी पालिका अद्ययावत कत्तलखाना उभारणार आहे.

शहरातील अनेक भागांत उघडय़ावर प्राण्यांची कत्तल केल्याचे दिसून येत आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही हानीकारक असल्याने यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी उघडय़ावर कत्तल करू नये.

– महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका