उन्हाळ्यात नवी मुंबईकरांना पाण्याची जास्त झळ बसू नये यासाठी पाणीटंचाईच्या अनेक उपाययोजना करणाऱ्या पालिकेने आता एक नवीन युक्ती लढवली आहे. ज्या सोसायटी पाण्याचा जास्त वापर करीत असल्याचे आढळल्यास त्यांना कमी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी व्यक्तीमागे पाण्याचा वापर आणि सोसायटी सदस्य संख्या लक्षात घेतली जाणार आहे. दरम्यान, पालिकेने ही कपात ३० टक्क्यापर्यंत नेली आहे. त्यामुळे जुलैअखेपर्यंत आवश्यक इतके पाणीपुरवठा करता येण्यासारखा आहे.
नोव्हेंबरपासूनच नवी मुंबईत २५ टक्के पाणीटंचाईची पावले उचलली गेल्याने नाराजी पसरली गेली होती मात्र हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यासाठी पालिकेने उद्यान, गतिरोधक सुशोभीकरण याला देत असलेले पाणी बंद करून टाकले असून पालिका क्षेत्रातील ८० कूपनलिका, ९० विहिरी आणि १४ तलावांचा व सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा आधार घेण्यात आला आहे. या ठिकाणाहून पाणी आणून या सार्वजनिक वापरासाठी दिले जात आहे. पािलका पाणी नियोजनाचे अनेक मार्ग स्वीकारत असताना नवी मुंबईकरांना मात्र पाण्याच्या गैरवापराची सवय जात नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे पाण्याचा जादा वापर करणाऱ्या ६२५ सोसायटय़ांना नोटीस देण्यात आल्या असून त्यांना पाणी वापर कमी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही काही सोसायटी वाहन धुणे, उद्यानांना हिरवेगार करण्यात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या पाणी विभागाने यावर एक शक्कल शोधून काढली असून पाण्याचे महत्त्व न कळणाऱ्या रहिवाशांना धडा शिकविण्यासाठी त्या भागात कमी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीच कमी मिळू लागल्यास वाहन, उद्यान धुणार कुठून हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या १८ ठेकेदारांच्या कामगारांचे सहकार्य घेतले जाणार आहे. हे कामगार सकाळी पाण्याचा गैरवापर करणाऱ्या सोसायटी, नागरिक यांच्यावर नजर ठेवणार आहेत. गैरवापराचा अंदाज सोसायटींना जाणाऱ्या बिलामुळेदेखील येत आहे. त्यामुळे यापुढे जादा वापर, कमी पुरवठा हे तंत्र पालिका वापरणार आहे.