ओल्या – सुक्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन
नवी मुंबई शहरातील स्वच्छतेबाबत होणाऱ्या तक्रारींसाठी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत १ जानेवारीपासून व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला आहे. ९७६९८९४९४४ या क्रमांकावर नागरिकांना तक्रारी नोंदवता येतील.
घनकचरा व्यवस्थापन विभागाची ही सेवा आहे. नागरिक अस्वच्छतेसंदर्भातील छायाचित्रे समाजमाध्यमांवर पाठवू शकतील. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे प्राथमिक पातळीवर म्हणजेच घरातच वर्गीकरण झाल्यास प्रदूषण रोखण्यात यश मिळविता येईल. हाच उद्देश घेऊन पालिकेने हे पाऊल टाकले आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे घरातच वर्गीकरण करावे, असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्राने केलेल्या सव्र्हेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेने देशात तिसरा, तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला. शहराची ही प्रतिमा कायम ठेवण्यासाठी नवी मुंबई स्वच्छ अभियानाअंतर्गत विविध उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर दिला आहे.
पालिकेच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजमाध्यमांचा वापर करून शहरांतील स्वच्छतेविषयक प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आल्याचे महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.