संतोष जाधव,लोकसत्ता
नवी मुंबई: जलसंपन्न महापालिका म्हणून नावलौकीक असलेल्या महापालिकेवरही यंदा पाणी कपातीचे संकट आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व स्कायमेटच्या अंदाजानुसार लांबणीवर पडणारा पाऊस व पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने पालिकेने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करण्याचे सूचित केल्याप्रमाणे २८ एप्रिलपासूनच शहरातील विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा सध्या केला जात नाही. परंतु दुसरीकडे अजूनही शहरातील नागरीकांनी वापरावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. शहरातील ३३६ सोसायट्या पालिकेने मंजूर पाण्याच्या कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याचे समोर आले असून पालिकेने अशा सोसायट्यांना नोटीस बजावल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका महाराष्ट्रातील जलसंपन्न महापालिका आहे.परंतू खबरदारी म्हणून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यंदा नवी मुंबईत मोरबे धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नाही. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने धरणात कमीसाठा शिल्लक असून अवघा ३३.३८ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून ३ ऑगस्ट पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल इतकाच पाण्यासाठी मोरबे धरणात उपलब्ध आहे.
आणखी वाचा- नवी मुंबई : पावणेतील आदिवासी पाड्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण
नवी मुंबई शहरात प्रत्येक दिवसाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून आठवड्यातून एक दिवस एका विभागाचा संध्याकाळचा पाणीपुरवठा केला जात नाही. नवी मुंबई शहरात स्वताःचया मालकीचे धरण असून नागरीकांना २४ तास पाणीपुरवठ्याची सवय लागली आहे. परंतू त्यामुळे पाण्याचा गैरवापरही होत आहे. २८ एप्रिलपासून शहरात विभागावार एक वेळचे पाणी न दिल्याने पाण्याची बचत होत आहे. विशेष म्हणजे शहरात कोठेही पाणी तुटवड्याची ओरड नाही. त्यामुळे भविष्यकाळचे नियोजन म्हणून पालिकेने सध्या सुरु असलेली पाणीकपात कायमही केल्यास अधिक पाणीबचत होण्याची शक्यता आहे. शहरात नागरीकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सोसायट्यांना पालिकेमार्फत घरे तसेच तेथील नागरीक यांच्या प्रमाणानुसार संपूर्ण सोसायटीला पाणी कोटा मंजूर केला जातो व त्याप्रमाणे नळजोडणी केली जाते. परंतू शहरात सोसायट्यामध्ये मंजूर पाणी कोट्यापेक्षा अधिक पाणीवापर होत असल्याचे निदर्शनास आले असून पालिकेने शहरातील अशा ३३६ सोसायट्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सोसायट्यांनी पाणी वापरावर नियंत्रण न ठेवल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहरात अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्या सोसायट्यांमध्ये सर्वच आठही विभागातील काही सोसायट्यांचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरीकांनी पाण्याची बचत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी शहरात प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा केला जात नाही. शहरातील सोसायट्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक वापर करण्यात आलेल्या शहरातील ३३६ सोसायट्यांना नोटीसा बजवल्या आहेत.त्यांनी पाणी वापर कमी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरीकांना पाणी जपून वापरुन पालिकेला सहकार्य करावे. -संजय देसाई, शहर अभियंता
शहरातील अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्या विभागवार सोसायट्यांची संख्या…
बेलापूर- ६०
नेरुळ- १५
वाशी- ७५
तुर्भे- १०
कोपरखैरणे- ५५
घणसोली- ३०
ऐरोली- ८
दिघा- ८०
एकूण-३३६ सोसायट्या
मोरबे धरणात शिल्लक पाणीसाठा- ३३.३८ टक्के