पनवेल ः महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी प्रत्येक कुटूंबांमध्ये साजरी करावी यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा ५.० या योजनेअंतर्गत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांनी काय करावे असे विविध पर्याय मुलांना सूचविण्यात आले. तसेच पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या दरम्यान फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे श्वसनदाह आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनूसार हरित सण अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी विद्यार्थ्यांनी साजरी करावी यादृष्टीने ही जनजागृती पालिकेने केली आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्वापर करण्यात येणाऱ्या वस्तू पासून पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनवून दाखवले.