पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात भटकी कुत्री आणि मांजरांचे सर्वेक्षण पालिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे (ए.आय.) नुकतेच केले. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर कुत्रा व मांजरांच्या प्रभावी लसीकरण व निर्बीजीकरणासाठी पालिका आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. एप्रिल महिन्यापासून पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने पालिका सुरू करणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

दोन फिरत्या रुग्णवाहिकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, मदतनीस आणि त्यांच्यासह औषधांचा साठा, उपचारासाठीचे साहित्य अशा सर्व सुविधांनी हा दवाखाना परिपूर्ण असेल. पनवेलमध्ये भटक्यांसह पाळीव कुत्रे आणि मांजरांसाठी हा दवाखाना काम करणार आहे.रेबीज निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रम योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला. झायमॅक्स टेक सोल्युशन या कंपनीला हे काम देण्यात आले. इंडिकेअर या तंत्रज्ञानाच्या साह्याने वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण केल्यामुळे पालिकेकडे सध्या १३,६०१ श्वान आणि ४०८ मांजरींचा तपशील आहे. पालिका क्षेत्रात सुमारे १९ हजार भटके श्वान आणि ५ हजारांहून अधिक मांजरी आणि सुमारे ९ हजार पाळीव श्वान असल्याची शक्यता या अहवालात वर्तविली आहे.

सध्या पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी बी.एन.गीते, डॉ. मधुलिका लाड, दत्ता मासाळ यांच्या देखरेखीखाली हे नियोजन सुरू आहे. निर्बीजीकरण आणि लसीकरण वेळीच झाल्यास भविष्यातील भटके कुत्र्यांपासून उपद्रव नियंत्रणात आणता येईल असे पालिकेचे नियोजन आहे. महापालिकेच्यावतीने मागील सात वर्षांपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. या अहवालामुळे पालिका क्षेत्रातील ४० टक्के निर्बिजीकरण झाल्याचे समजल्याने उर्वरीत ६० टक्के कुत्र्यांकडे पालिकेने लक्ष्य केंद्रीत केले आहे.
सर्वेक्षणामुळे पालिकेकडे १३,६०१ कुत्र्यांची छायाचित्र चार वेगवेगळ्या पद्धतीने मिळाली आहे. या सर्वेक्षणामुळे कुत्र्यांना त्यांच्या ओळखीसाठी ओळख क्रमांक (आधारक्रमांक) पालिकेकडून मिळाला आहे. त्या कुत्र्यांचे सध्याचे वय आणि त्याच्या प्रकृतीची माहिती, अंगावरील जन्माची व्रण असे सर्व माहितीसह संकलित केली आहे. लसीकरणासाठी तो श्वान कुठे सापडेल त्याचा रहदारीचा पत्ता व लोकेशन पालिकेकडे दिलेल्या अहवालात दर्शविण्यात आला आहे. एका फोटोच्या क्लिकवर संबंधित श्वानाची माहिती पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे मिळू शकेल. या सर्वेक्षणानूसार पनवेल पालिका क्षेत्रात ५० टक्के नर कुत्रे, ३६ टक्के मादी कुत्रे आणि १४ टक्के न ओळख झालेल्या कुत्रे वावरत आहेत.

खारघरमध्ये सर्वाधिक श्वान

या सर्वेक्षणात खारघर हा सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागामध्ये ६३३४ श्वान आढळले आहेत. त्यापैकी ४० टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले आहे. कळंबोलीत ३२७० कुत्रे आढळले असून त्यापैकी ५६ टक्के कुत्र्यांचे निर्बीजीकरण शिल्लक आहे. कामोठे प्रभागामध्ये २३७५ कुत्रे आढळले तर पनवेल शहराच्या प्रभागामध्ये १६२२ कुत्रे आढळल्याचे अहवालात नमूद आहे.