पनवेल: पूणे येथील तिहेरी हत्याकांडामधील पिडीतेचा कळंबोली येथील अमर रुग्णालयामध्ये ८ जुलैला मृत्यू झाल्याने अमर रुग्णालयाची वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. फेब्रुवारी महिन्यात अमर रुग्णालयात एका महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता. यापूर्वीच्या माता मृत्यूमध्ये वादग्रस्त ठरलेल्या अमर रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवल्यानंतर एकही नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल करु नये अशा सूचनेची नोटीस असताना सुद्धा पीडीतेला ८ जुलैला दाखल करुन तीला दोन सलाईन दिवसभर लावण्यात आल्या. त्यानंतर त्याच रात्री तीचा मृत्यू झाला. आजही या रुग्णालयात रुग्ण दाखल केले जात आहेत. अमर रुग्णालय छुप्या पद्धतीने रुग्ण दाखल करतात का यावर पालिकेची कडक नजर असती तर तिहेरी हत्याकांडाची घटना टळली असती अशी चर्चा पनवेलमध्ये सूरु आहे.
अमर रुग्णालयाची वैद्यकीय सेवा संशयाच्या भोव-यात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या माता मृत्यूनंतर अमर रुग्णालयाची वैद्यकीय तपासणी केली होती. या तपासणीमध्ये रुग्णालयामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध झाल्यानंतर मार्च महिन्यात अमर रुग्णालयाला पालिकेच्या आरोग्य विभागाने नवीन रुग्णांना दाखल करु नये अशा सूचनांची नोटीस दिली होती. या नोटीसीनंतर सुद्धा अमर रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करुन घेतले जातात का यासाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने २० मार्च, १२ एप्रिलला अमर रुग्णालयात अचानक भेट दिली. मात्र त्यांना त्यावेळी रुग्ण सापडले नाहीत आणि रुग्ण नोंदवही सापडली नसल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगीतले.
हेही वाचा >>>दलालांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन; जनतेत योग्य संदेश जात नसल्याची गणेश नाईकांची टीका
अमर रुग्णालयात नेमके काय घडले
अमर रुग्णालयात ८ जुलैला २५ वर्षांची पीडीतेला घेऊन येणा-या व्यक्तीने स्वताची ओळख तो डॉक्टर असल्याचे डॉ. पोळ यांना सांगीतले. पीडीता त्याची पत्नी आणि दोन बालकांचा तो पिता असून पिडीतेला पोटदुखी, ताप आणि अशक्तपणा तसेच तीच्या शरीरात रक्त कमी असल्याने तीला दोन सलाईन लावण्याची विनंती केली. अमर रुग्णालयाला दाखल करुन घेतल्याशिवाय सलाईन लावू शकत नसल्याचे माहिती असून देखील डॉ. पोळ यांनी पिडीतेला तपासल्यानंतर तीला रुग्णालयात दाखल करुन तीला सलाईन लावल्या. सकाळी साडेनऊ वाजता आलेली पीडीतेचा रात्री पावणेदहा वाजता मृत्यू झाला. मृत्यूचे कारण शरीरात रक्तकमी आणि अशक्तपणामुळे तीचा मृत्यू झाल्याचे डॉ. पोळ यांनी दिलेल्या मृत्यू दाखल्यात म्हटले आहे. मृतदेह ताब्यात देताना डॉ. पोळ यांनी शवविच्छेदनासाठी स्थानिक पोलीसांना कळविले नाही. पिडीतेच्या शरीरात रक्तकमी असल्याने ती अशक्त होती. रक्तप्रमाण किती याची तपासले गेले नाही.
कोण आहेत डॉ. पोळ
६९ वर्षांचे डॉ. अर्जुन पोळ यांनी मिरज येथून १९७८ एमबीबीएस त्यानंतर जे.जे. रुग्णालयातून वैद्यकीय एम. एस.चे शिक्षण त्यांनी पुर्ण केले. त्यांनी १० वर्षे सरकारच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक या पदापर्यंत सेवा केली. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसाय सूरु केला. परंतू सरकारी कामाची सर्व पद्धत माहिती असतानाही डॉ. पोळ यांनी पिडीतेच्या मृत्यूनंतर तीचा मृतदेह स्थानिक पोलीसांना न सांगीतल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.