उरण : सरकार आणि सिडकोच्या माध्यमातून नैना प्राधिकरण शेतकऱ्यांना मोबदला न देता त्यांच्या जमिनी फुकटात लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. या जमीन लुटीला शेतकऱ्यांनी एकजूटी ने विरोध करण्याचा निर्धार मंगळवारी पेण येथील सभेत देशाच्या स्वातंत्र्यदिनीच केला आहे. यासाठी पेण तालुक्यातील दिव गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेतकऱ्यांनी नैना प्रकल्पाला कायम विरोध व प्रकल्प का नको हा शासनाचा प्रकल्प शेतकऱ्याच्या हिताचा नसून आपणास शासन कसे फसवितहे याची सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. या सभेला ऍड. सुरेश ठाकूर, नगररचनाकार अतुल म्हात्रे, कॉम्रेड भुषण पाटील, शिवकरचे सरपंच अनिल ढवळे ऍड. संदीप पाटील, सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर मोरे , रमाकांत पाटील, आर के पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संजय ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, मोहीनी गोरे, राजन झेमसे,हेमंत पाटील, दिलीप पाटील,काशिनाथ पाटील,राम ठाकूर यांच्यासह पेण तालुक्यातील सर्व संघटनाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
आपला लढा तीव्र करण्यासाठी गावोगावी बैठकांचे आयोजन व प्रत्येक ग्राम पंचायती मध्ये ग्रामसभेत नैना नको असा ठराव शासन दरबारी पाठविणेचे सर्व शेतकर्यानी न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचाही निर्णय घेतला आहे. यावेळी कवी अशोक मढवी व पुंडलिक म्हात्रे यांनी नैना नको या विषयावर कविता सादर केल्या.