पनवेल : दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला द्यावे, ही मागणी रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी अस्मितेचा विषय बनली आहे. सध्या लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी परस्परविरोधी राजकीय पक्षांच्या दोन्ही उमेदवारांकडून दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची जाहिरात करुन दोनही राजकीय पक्ष स्वत:च्या पदरात मते मागत असल्याचे दिसत आहे.

मंगळवारी दुपारी मावळ लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी घेतलेल्या कळंबोली येथील देवांशी इन हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत चुकीच्या पद्धतीने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या नामकरणाविषयी सेनेचा अपप्रचार करत असल्याचा मुद्दा मांडला. यावेळी बबन पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळ प्रकल्पाला मिळावे यासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) प्रशांत पाटील, सतीश पाटील, शेकापचे गणेश कडू व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा…नवी मुंबई: निम्मे शहर सीसीटीव्ही कक्षेबाहेरच, आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीतही काम अपूर्णच

तसेच महायुतीची रविवारी झालेल्या कामोठे वसाहतीमधील प्रचार सभेत उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे होत असलेल्या नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत दिवंगत दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. बारणे हे मागील १० वर्षांपासून या परिसराचे खासदार होते. केंद्रातील सरकारकडेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला नावाचा प्रस्ताव रखडला आहे. बारणे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या पुस्तिकेमध्ये नामांतरणांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावाने केले आहे. दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल यांनी काही दिवसांपूर्वी बारणे यांच्यासाठी केलेल्या भाषणात महाविकास आघाडीवर संताप व्यक्त केला होता.

Story img Loader