दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी मासेमारीला आरंभ केला. होडय़ांची रंगरंगोटी करून त्यांना सजविण्यात आले होते. या वेळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून रक्षणासाठी आणि माशांच्या अफाट दौलतीसाठी सागराला साकडे घालण्यात आले. स्वाध्याय परिवाराच्या वतीने बेलापूर, करावे, शिरवणे, दिवाळे, सारसोळे, खारघर, कोपरा, आग्रोळी, शहाबाज आदी ठिकाणी भव्य मिरवणूक काढण्यात येऊन बोटी, होडय़ा आणि मासेमारीच्या जाळ्यांची पूजा करून पुन्हा बोटी पाण्यात उतरविल्या.
मिरवणुकीत कोळी बांधवांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. कुलदेवता आणि ग्रामदेवतेची पूजा करण्यात आली. नवी मुंबईत दिवाळे कोळीवाडा येथील सिद्धी मित्र मंडळ आणि दिवाळे ग्रामस्थ करावे गावातील शाहीर सुखदेव तांडेल आणि मंडळी, सारसोळे कोळीवाडय़ातील कोलवाणी मित्रमंडळ आणि एकवीरा युवक मित्रमंडळ, वाशी गावातील मच्छीमार मित्रमंडळ, घणसोलीतील जय मरीआई मित्रमंडळ आणि महिला मंडळ, दिवा कोळीवाडा येथील नवजीवन कलापथक, ऐरोली कोळीवाडय़ातील चंदू कोळी मित्र आणि ग्रामस्थ यांनी ऐरोलीतील खाडीत, तर करावे आणि दरावे गावातील ग्रामस्थांनी पाम बीच जेट्टीवर नारळ अर्पण केला.
ऐरोली दिवा कोळीवाडय़ात नवजीवन कलापथक आणि कोळी समाज विठ्ठलभक्त विश्वस्त मंडळाने मिरवणूक काढली. समुद्राला पुरणपोळी आणि नारळी पाकाचा नैवेद्य दाखविण्यात आला.