नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक ८८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालदी यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी १० जानेवारी रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत ही जागा टिकविण्यासाठी राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे. या एका जागेसाठी शिवसेना-भाजप एकत्र आले असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत हा प्रभाग भाजपच्या वाटय़ाला आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई पालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्या वेळी नेरुळ सेक्टर-१५, ११, २९ व तीनचा काही भाग असलेल्या प्रभाग क्रमांक ८८ मधून अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकला मालदी विजयी झाल्या होत्या. ऑक्टोबरमध्ये त्यांनी मानसिक तणावाखाली आत्महत्या केली. त्यामुळे या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष त्यासाठी उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालिकेतील संख्याबळ काही कारणास्तव कमी होत आहे. दिघा येथील बेकायदा बांधकामात राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य न केल्याने तेथील तीन नगरसेवक शिवसेनेच्या गोटात गेलेले आहेत. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत काठावर पास झालेल्या राष्ट्रवादीला गळती लागली आहे. त्यात काही नगरसेवक जातीच्या प्रमाणपत्रावरून अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पमतात येण्याची भीती व्यक्त केली जात असून काँग्रेसच्या पाठिंब्यावर ही सत्ता कायम राहणार आहे. त्यामुळे नेरुळमधील एक जागादेखील राष्ट्रवादीला महत्त्वाची आहे. या ठिकाणी पक्षाने शिल्पा कांबळी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर शिवसेना-भाजपने सरस्वती पाटील या माजी नगरसेविकेला उभे केले आहे. त्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीय असल्याने त्यांना भाजपतून उमेदवारी देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीत सेना-भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते पण राष्ट्रवादीला अस्मान दाखविण्यासाठी आणि वेळप्रसंग पडल्यास काँग्रेसच्या मदतीने पालिकेतील सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीला ही जागा जड जाणार आहे. सेनेचे उपविभागप्रमुख संजय भोसले यांची पत्नी साक्षी भोसले ह्य़ा या प्रभागात बंडखोरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीला ही जागा जिंकणे सोपे जाणार आहे. काँग्रेसच्या आधीच्या उमेदवार नूतन राऊत या पुन्हा नशीब आजमवणार आहेत.

निवडणुकीत आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत इच्छुक होते. त्यासाठी हा प्रभाग शिवसेनेला सोडावा, यासाठी मंदा म्हात्रे यांच्या त्यांनी मिनतवाऱ्या केल्या. मात्र, म्हात्रे यांनी त्याला जुमानले नाही. भगत यांच्या पत्नी यापूर्वी सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narul by election tiring for ncp