उरण : खोपटे पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या खोपटे पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असून या पुलाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांना जोडणाऱ्या खोपटे पुलाच्या दोन्ही मार्गिका खड्डेमय झाले आहेत. पुलावरील या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या पुलावरून दररोज शेकडो अवजड वाहने वाहतूक करीत आहेत. उरणच्या दोन विभागांना जोडणाऱ्या महत्वाच्या खोपटे पुलावर ये जा करण्यासाठी दोन मार्गिका आहेत. या पुलावरील डांबरेचे थर उखडल्याने खड्डे झाले आहेत. यात जुन्या पुलावरील स्लॅब मधील सळया मोकळ्या झाल्या आहेत. त्या वाहनांचा टायर अडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा : PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित मोडणाऱ्या या पुलाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. अवजड वाहना बरोबरच प्रवासी वाहनेही मोठया प्रमाणात प्रवास करीत आहेत. या प्रवासी वाहनांना ही धोका निर्माण झाला आहे. खोपटे पूल ते कोप्रोली हा मार्ग आधीच नादुरुस्त आहे. याचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे खोपटे पूल आणि मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
चौकट
१९९५ चा जुना पूल
खोपटे खाडीपूल हा एक ऐतिहासिक आहे. अनेकवर्षे रखडल्या नंतर उदघाटना विनाच १९९५ ला हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लोड बेरिंग ने जोडलेल्या या पुलावरून सध्या मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे तो वारंवार नादुरुस्त होऊ लागला आहे.
हेही वाचा : नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
जुन्या खोपटे पुलाच्या मजबुतीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून त्याची खाडीच्या दिशेने तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार या पुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पूलावरील वारंवार उडखत असलेल्या धरावर उपाय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून थर टाकण्यात येणार आहे.
नरेश पवार, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण