नवी मुंबई : घणसोली येथील महापालिका शाळेच्या सहलीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नवी मुंबई महापालिकेने त्रिसदस्यीय समिती गठित गेली आहे. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल २५ फेब्रुवारी रोजी खोपोलीतील इमॅजिका ॲडव्हेन्चर पार्क येथे गेली होती. या सहलीदरम्यान पालिकेच्या घणसोली येथील शाळेत शिकणाऱ्या आयुष धर्मेंद्र सिंग या आठवीतील एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या नियमांना बगल देत काढलेली सहल, परीक्षा कालावीधीतील सहलीचे आयोजन, एकाच ठिकाणी सर्व सहलींचे नियोजन असे अनेक मुद्दे पुढे आले. परिणामी पालकांसह विविध राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर चौफेर टीका केली. काही राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयाबाहेर ‘जोडे मारा’ आंदोलनही केले. पालिका शिक्षण उपायुक्त व शिक्षणाधिकारी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. यामुळे पालिका प्रशासनासमोर या घटनेच्या चौकशीचा दबाव होता. या मुलाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याचे निवेदन आधी पालिकेने दिले आणि आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी पालिका आयुक्तांनी ही त्रिसदस्यीय समिती गठित केली.

शासकीय आदेशानुसार शाळांच्या शैक्षणिक सहली या कोठे काढाव्यात याबाबत स्पष्ट आदेश असतानाही पालिका शिक्षण उपायुक्त तसेच शिक्षणाधिकारी यांनी शासकीय नियमांची पायमल्ली करत इमॅजिका येथे सहल काढली होती. सध्या वार्षिक परीक्षांचे दिवस सुरु असताना परीक्षांच्या कालावधीत सहली काढल्याबद्दलही रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी पालिकेने इमॅजिका पार्कला जाणाऱ्या सर्व सहली रद्द केल्या.

त्रिसदस्यीय समितीत कोण?

डॉ. राहुल गेठे (अतिरिक्त आयुक्त २) – अध्यक्ष

शरद पवार (पालिका उपायुक्त) – सदस्य सचिव

भागवत डोईफोडे (उपायुक्त) – सदस्य

Story img Loader