भविष्यात वाढणारी विमानप्रवासी संख्या लक्षात घेता दोन वर्षांत धावणारी नवी मुंबई मेट्रोही मुंबईतील मेट्रोला जोडण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको प्रशासनाला केल्या आहेत. त्यामुळे बेलापूर ते पेंदार या अकरा किलोमीटर मार्गावर सुरू असलेली मेट्रो घोडदौड आता मुंबईत घाटकोपर किंवा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिडको प्रशासन या दोन्ही मार्गाची चाचपणी करीत आहे.
मुंबई विमानतळावर दिवसेंदिवस वाढणारा प्रवासी संख्येचा ताण पाहता राज्य सरकारने प्रथम नवी मुंबईजवळ दुसऱ्या राष्ट्रीय विमानतळाचा विचार सुरू केला होता. त्याच वेळी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला पर्याय शोधण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नवी मुंबईतील राष्ट्रीय विमानतळाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेली १७ वर्षे नवी मुंबईतील विमानतळाची चर्चा सुरू असून आता ह्य़ा विमानतळाच्या निदान कामाचा टेक ऑफ तरी डिसेंबर अखेपर्यंत होण्याची शक्यता आहे. जगातील अनेक अद्ययावत आणि आधुनिक विमानतळाशी तुलना करणाऱ्या या विमानतळावर दोन ग्रीन फिल्ड रन-वे राहणार आहेत. २०१९ अखेपर्यंत या विमानतळाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणार असून जमीन संपादन, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, निविदाकारांची आर्थिक चाचपणी हे सर्व टप्पे पार झाले आहेत. येत्या तीन महिन्यांत पंधरा हजार कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा काढली जाणार असून चार निविदाकार हा प्रकल्प हाती घेण्याच्या तयारीत आहेत. ही प्रक्रिया संपल्यानंतर या वर्षांअखेर विमानतळाचे काम सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. चार वर्षांत उभ्या राहणाऱ्या विमानतळासाठी इतर वाहतूक संलग्नता याचा अभ्यास केला जात असून प्रवासी बस वाहतुकीबरोबर मेट्रो, मोनो, जलवाहतूक यांचे पर्याय शोधले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही बडय़ा प्रकल्पांवर जातीने लक्ष ठेवले असून त्यात नवी मुंबईतील विमानतळ आणि नैना प्रकल्प आहेत. विमानतळाशी मेट्रो कनेक्टिव्हिटी दृष्टीने त्यांनी सिडकोला नुकत्याच लेखी सूचना केलेल्या असून प्रस्तावित नवी मुंबई व मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सुखकारक प्रवासासाठी मेट्रो संलग्नता आवश्यक असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सिडकोने मुख्यमंत्र्याच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून सध्या कार्यरत असलेल्या मेट्रोशी घाटकोपपर्यंत ही जोडणी करायची की नव्याने पनवेल ते अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापर्यंत हा मार्ग नव्याने तयार करायचा याबाबत चर्चा सुरू आहे. सिडकोने नवी मुंबईतील मेट्रोचे काम तीन टप्प्यांत करावयाचे ठरविले असून साडेचार हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा प्रकल्प मुंबईत नेल्यास त्याचा खर्च दुपटीने वाढणार आहे. नवी मुंबईत सिडकोची स्वमालकीची जमीन असल्याने जमीन संपादनाचा प्रश्न आला नाही, पण मुंबईत जमीन संपादनापासून ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. सिडको प्रशासनाच्या चर्चेत ह्य़ा सर्व प्रश्नांची अगोदर उत्तरे शोधली जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेली सूचना ही रास्त असल्याने आंतरराष्ट्रीय विमानप्रवाशांना दोनपैकी एका विमानतळाचा उपयोग करताना जलदगती प्रवासासाठी मेट्रो हा चांगला पर्याय ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी देशभरातून आलेल्या प्रवाशांना सामानांच्याही संलग्नतेची या मेट्रो प्रवासामुळे काळजी घेतली जाणार आहे.
नवी मुंबई व मुंबई मेट्रोजोडणीची चर्चा सुरू असून ती काळाची गरज आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोचा मार्ग घाटकोपपर्यंत वाढविण्यात यावा, की नव्याने जुना आणि नवीन विमानतळ जोडण्यात यावा याबाबत सध्या चाचपणी सुरू असून लवकरच या प्रकल्पाला मूर्त स्वरूप दिले जाणार आहे.
संजय भाटिया, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको