उरण : नवी मुंबई विमानतळ नामकरण मागणीसाठी तीन वर्षे लढा सुरू आहे. मात्र त्याचा निर्णय होत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने तातडीने दिबांच्या नावाचे आश्वासन न दिल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, अशी माहिती सर्वपक्षीय नवी मुंबई विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वपक्षीय नामकरण समितीने दिल्लीत केंद्रीय नागरी विमान मंत्र्यांची नुकतीच भेट घेतली होती. यावेळी पुन्हा एकदा केंद्राने दिबांच्या नावाचे आश्वासन दिले आहे. तसेच यासाठी एकमेव दिबांच्याच नावाचा प्रस्ताव असल्याचेही स्पष्ट केले आहे. तत्कालीन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्र्य संधिया यांनीही अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. मात्र मार्च २०२५ पासून नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार असून अजूनपर्यंत दिबांच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला नसल्याने नामांतरणाचा निर्णय केव्हा होणार असा प्रश्न आता भूमिपुत्रांना पडला आहे. भूमिपुत्रांच्या संघर्षामुळे दिबांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्याची दखल घेत केंद्र सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. लवकरच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री कंजरापू राम मोहन नायडू यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली होती.

आणखी वाचा-बेलापूरमध्ये बंडोबांच्या शोधासाठी भाजप सक्रिय, वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग

लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने नामकरणाचा पाठपुरावा आणि सद्या:स्थिती जाणून घेण्यासाठी नवी दिल्ली येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री नायडू यांची भेट घेतली होती. त्यांनी दिबांच्या खेरीज कोणाच्याही नावाचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाला आला नसल्याचे स्पष्ट केले.

निवडणूक संपताच नामकरण समिती केंद्र सरकारने नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या निश्चितीचे ठोस आश्वासन देण्याची मागणी करणार आहे. ती मान्य न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करणार आहोत. -दशरथ पाटील, नामकरण समिती अध्यक्ष.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai airport naming movement will be intensified after election says naming committee president dashrath patil mrj