नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या तीन महिन्यांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. विमानतळ ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जागेवर उभारले त्यांना विमानतळातील नोकरीत प्राधान्य द्यावे अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर सिडको मंडळ आणि अदानी कंपनीकडून प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी सिडकोच्या तारा सेंटरमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी गेल्या तीन महिन्यांपासून १२०० इच्छुकांचे अर्ज आले. सिडको मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अभ्यासक्रमानुसार फेब्रुवारी महिन्यात प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्याची माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पामध्ये नोकरी मिळावी, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त तरुणांनी गेल्यावर्षी जलआंदोलन आणि इतर आंदोलने करुन सिडको आणि अदानी कंपनीचे लक्ष वेधले होते. तरुणांच्या याच मागणीचा सिडको मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गांभीर्याने विचार केला. प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सिंघल यांनी विमानतळाशी निगडीत नोकऱ्यांसाठी लागणारे प्रशिक्षणवर्ग सरकारमार्फत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनपूर्तीचा भाग म्हणून सिडको मंडळाच्या परिवहन आणि विमानतळ विभागांसह ‘तारा प्रशिक्षण केंद्र’ आणि अदानी कंपनीच्या सहकार्याने हे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत.
कोणते प्रशिक्षण?
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अभ्यासक्रमामार्फत एअरलाईन बॅगेज हॅन्डलर, एअरपोर्ट टर्मिनल ऑपरेशन व्यवस्थापक, एअरपोर्ट कार्गो ऑपरेशन, कस्टमर केअर प्रतिनिधी, एअरलाईन्स ग्राऊंड स्टाफ अशा विविध विभागांचे प्रशिक्षण तरुणांना दिले जाणार आहे. बारावी, पदवीधर आणि उच्च शिक्षण घेतलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी ही संधी आहे. सुरुवातीला पाच पदांसाठी तारा केंद्रातून हे प्रशिक्षण दिले जाईल.
सिडको मंडळ प्रकल्पग्रस्तांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना काळानुरुप कौशल्यप्रधान बनविण्यासाठी हा उपक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी राबविणार आहे. काही दिवसांत हे प्रशिक्षण केंद्र सुरू होऊन त्यामधून प्रशिक्षित कुशल उमेदवारांना विमानतळातील नोकऱ्यांसाठी स्पर्धेत पात्रता योग्य करणे, हाच या प्रशिक्षण केंद्राचा हेतू आहे.
प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ
विमानतळ प्रकल्पबाधित तरुणांसाठी तारा सेंटर येथे सिडकोचे प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत. जे प्रशिक्षण आरेखित केलेले आहे ते विमानतळ परिसंचालनाच्या दृष्टिकोनातून समर्पक आहेत. कोर्स समाप्तीनंतर कोर्स केलेल्या तरुणांना विमानतळामध्ये समाविष्ट करण्यात यावे, ही अदानी व सिडकोकडे आमची आग्रही मागणी आहे. ॲड. विक्रांत घरत, प्रवक्ता, लोकनेते दि बा पाटील प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था