Navi Mumbai Airport Naming Controversy: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतून जाणारा शीव-पनवेल मार्गावरील बेलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सर्व वाहतूक शीळफाटा मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर तसंच आंदोलनावर दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.

“बाळासाहेब ठाकरे किंवा दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं हा संघर्ष आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली आहे. आंदोलनास सुरुवात करण्याआधी आंदोलक नेत्यांकडून दि बा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : पोलीस जिथे अडवतील, तिथंच ठिय्या आंदोलन; कृती समिती ठाम

पुढे ते म्हणाले की, “हा वाद आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांच्या नावाला विरोध करणारे नेते कित्येक वर्षांपासून त्यांचं नाव द्यावं यासाठी आग्रही होते. त्यामुळे हा वाद राजकीय आहे”.

“१० तारखेच्या आंदोलनानंतरही सरकार काही शिकलं नाही. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका बदलली नाही त्यामुळे आजचं आंदोलन करण्यात येत आहे. आज दि बा पाटील यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने सिडकोला घेराव आंदोलन करत असून तो शांतपणे आणि यशस्वी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलकांनी शांतपणे आंदोलन करुन सरकारला ताकद दाखवूयात असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.

बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद

या मोर्चात मोठा जनसमुदाय उतरणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरात फक्त कार्यालयीन कामासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अंतर्गत वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. या परिसरातून दररोज किमान १५ हजार लहान-मोठय़ा वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे ही वाहतूक वळविण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल-शीव महामार्गावर रोडपाली ते बेलापूर अशी वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला सर्वसामान्यांना सामोरं जावं लागत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेली वाहतूक कोंडीतील वाहनांची रांग कामोठे वसाहतीपर्यंत पोहोचली होती. कळंबोली सर्कल येथे जड व अवजड वाहने पनवेल-मुंब्रा महामार्गाच्या दिशेने वळविण्यात आली. मात्र पुरुषार्थ पंप (मार्बलबाजार) येथील उड्डाणपुल मुंबईकडे जाण्यासाठी बंद केल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.

नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या आज अल्प असेल असे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. पोलिसांनी टॅक्सी युनियन, खासगी टॅक्सी वाहतूक, ओला-उबेर चालकांच्या संघटनांशी चर्चा केली आहे. २४ तारखेला अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त या भागातील भाडे घेऊ नये अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. याशिवाय एमआयडीसीतील वाहतूकही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असा प्रकार जड अवजड वाहनांसह हलकी वाहनेही कमीतकमी रस्त्यावर यावीत असे प्रयत्न सुरू असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.

Story img Loader