नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शाळेतील सहलींदरम्यान एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाने नववी तसेच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर याच इमॅजिका पार्क येथे जाणाऱ्या जवळजवळ ६२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सहलीदरम्यान पालिका अधिकारी, कंत्राटदार यांचा गलथान कारभार घणसोली शाळा क्रमांक ७६ मधील आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. शैक्षणिक सहलींबाबत राज्य सरकारची विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे असताना ते नियम डावलून इमॅजिका पार्क येथे पालिका शाळेने सहल आयोजित केली होती. शिवाय यापुढील अनेक सहलींचे नियोजनही याच ठिकाणी केले होते. पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या नववी, दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर जवळजवळ ६२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहली इमॅजिका पार्कला जाणार होत्या. मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर त्यांना शाळेत बोलवून सहलींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली असून यापुढील इमॅजिका पार्कच्या सर्व सहली रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याबाबत नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
नवी मुंबई महापालिकेने इयत्ता ९ वी तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षानंतर सहलींचे नियोजन केले होते. या विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्यात आल्या आहेत. – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका