नवी मुंबई : वाशीतील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रांवरून परदेशात आंबा निर्यातीस एप्रिल महिन्यापासून सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आंबा निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा सुसज्ज आहेत. यंदा चार हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती मंडळाने दिली.
दरवर्षी आंब्याचा खरा हंगाम मार्च महिन्यात सुरू होतो तर फेब्रुवारीपासून हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. देशांतर्गत आंब्याची मागणी असतेच, मात्र परदेशातही आंब्याला पसंती दिली जात आहे. आखाती देश, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया या ठिकाणी निर्यात होते. देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत दरवर्षी ८० ते ८५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो. महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळ सुविधा केंद्रातून विशेष प्रकारच्या प्रक्रियेतून हापूस निर्यात होते. कृषी पणन मंडळाच्या विभागातून राज्यातील आंबा निर्यात वाढत आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांत हापूसबरोबर केसर, तोतापुरी, सुवर्णरेखा, बेगनपल्ली यांची निर्यात होत असते.
आंब्याच्या डोज मॅपिंगनंतर हिरवा कंदील
कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर अमेरिकन निरीक्षक १ एप्रिलपासून उपलब्ध असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत आंब्याचे डोज मॅपिंग करण्यात येणार असून प्रत्यक्ष आंबा निर्यात ३ एप्रिलपासून सुरुवात होईल. चालू वर्षी निर्यातदारांच्या अपेक्षा पाहता कृषी पणन मंडळाच्या वी किरण, वीपीएफ व बीएचटी या तीन सुविधा केंद्रांवरून सुमारे ४ हजार मेट्रिक टन आंबा निर्यातीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच महाराष्ट्र व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक व गुजरात या राज्यातील निर्यातदारही वी किरण सुविधा केंद्रास भेट देत असून नवीन निर्यातदार या सुविधा केंद्राला जोडले जाणार आहेत.
आंबा निर्यातीचे उद्दिष्ट (मेट्रिक टन)
युरोपीय देश – १७१०
अमेरिका – १३००
न्यूझीलंड – २००
ऑस्ट्रेलिया – ७५
जपान – ७०
दक्षिण कोरिया – १०
एकूण – ३३६५