नवी मुंबई: सानपाडा येथे एपीएमसीतील कंत्राटदार राजाराम टोके यांच्यावर बेछूट गोळीबार प्रकरणातील व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एपीएमसीतील कचरा उचलण्याच्या कंत्राट वादातून हा गोळीबार करण्यात आला होता.
हेही वाचा : सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
आशियातील सर्वात मोठी असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला बाजारातून कचरा उचलण्याच्या कंत्राट वरून अनेक गटात वाद आहेत. सानपाडा स्टेशन जवळ डी मार्ट चौकात ३ जानेवारीला सकाळी सव्वा नऊच्या सुमारास याच कंत्राट वादातून राजाराम टोले यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या टोके यांना लागल्या मात्र सुदैवाने राजाराम टोके याच्या वर्मी गोळ्या न लागल्याने जीवावर बेतले नाही. गोळी झाडणारे दुचाकीवरून आले होते. गोळीबार करून दोघेही फरार झाले होते. याच प्रकरणातील दुचाकी चालक संतोष गवळी (वय ३८ राहणार कोपरी) याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १४ तारखे पर्यंत पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी दिली.