नवी मुंबई : नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटी संबोधले जात असून डीपीएस, एनआरआय, टी एस चाणक्य तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होत असते. यंदा टी.एस चाणक्य तलावात फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. मात्र एनआरआय, डीपीएस तलावांना अद्याप फ्लेमिंगोंची प्रतीक्षा आहे.
नवी मुंबई शहरात फ्लेमिंगो पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे अशा विविध भागांतून नागरीकांची गर्दी पाहायला मिळते. टी.एस. चाणक्य तलावात फ्लेमिंगोंचे आगमन भरतीच्या वेळेनुसार होत असून १ ते दीड फूट पाण्यात फ्लेमिंगो मनसोक्त खाद्य मिळवतात. नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात फ्लेमिंगोना भरपूर खाद्य मिळत असल्याने त्यांचा वावर अधिक असतो. पुढील चार पाच महिने फ्लेमिंगो शहरात राहणार आहेत.
दरम्यान, फ्लेमिंगो पाहण्यासाठी येणारे नागरिक तलाव परिसरात अगदी तलावापर्यंत वाहने घेऊन जातात. हा प्रकार रोखावा व भुयारी मार्गाच्या पुढे वाहने घेऊन जाता येऊ नये यासाठी प्रवेशद्वार करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. काही उत्साही नागरिकांकडून तलावाजवळ वाहने पार्क करण्यावरून परिसरात नेहमी गर्दी, वादावादीचे प्रकार घडतात. नागरिक वाहने बामनदेव, तळणदेवपर्यंत घेऊन जातात. परिसरात होणारी पक्षीप्रेमींची गर्दी व अरुंद रस्ता यामुळे वाहने करावे भुयारी मार्गापर्यंतच घेऊन जावीत अशी मागणी सातत्याने केली जाते.
हेही वाचा – सिडकोच्या घरांचे दर दोन दिवसांत
टी एस चाणक्य तलावाजवळ चारचाकी व दुचाकी वाहने अगदी तलावाजवळ घेऊन जातात हे चुकीचे आहे. मुळातच ही पायवाट होती. येथे सिडकोने रस्ता बनवला परंतु तो अरुंद आहे. त्यामुळे टी. एस चाणक्य जवळ असलेल्या भुयारी मार्गापर्यंतच वाहने जाऊ द्यावीत. तसेच नागरिकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी. – धर्मेश बराई, पर्यावरण प्रेमी सेव्ह मॅन्ग्रोव्ह संस्था