नवी मुंबई : सिडकोच्या जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या जागी टॉवरचे इमले उभारणाऱ्या बिल्डरांनी या प्रकल्पास लागूनच असलेले वाशी परिसरातील उद्यानांच्या जागा गिळंकृत केल्याची प्रकरणे उघडकीस आली असताना या प्रकरणी इतका काळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना उद्यानांच्या या मोकळ्या जागा पुन्हा मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशी सेक्टर नऊ येथील साई आशीर्वाद, गुलमोहर, उत्कर्ष या जुन्या वसाहतींच्या जागी उभ्या राहात असलेल्या गृह प्रकल्पांमधून पुनर्रचना केलेल्या विकसित उद्यानांचा भाग महापालिकेस हस्तांतरित करून घ्यावा अशा सूचना उद्यान विभागाने मालमत्ता विभागास केल्या आहेत. विशेष म्हणजे हे प्रकल्प उभे राहात असताना ही उद्याने गिळंकृत होत असताना उद्यान विभाग नेमका काय करत होता असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा…खारघर येथील चोरी प्रकरणात पावणेचार लाखांच्या मुद्देमालासह तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात 

नवी मुंबईत सिडको तसेच खासगी वसाहतींमध्ये धोकादायक ठरलेल्या इमारतींचा पुनर्विकास मोठया प्रमाणावर सुरू आहे. वाशी सेक्टर नऊ परिसरात सिडकोने उभारलेल्या जे. एन. टाइप प्रकारच्या वसाहतींच्या जागी टॉवर उभारणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून वेगाने सुरू असून ही कामे करत असताना बांधकाम नियमांची तसेच प्रदूषण नियंत्रणासंबंधी नियमांची पायमल्ली केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपायांची आखणी न करणे, पाया खणताना केल्या जाणाऱ्या नियंत्रित स्फोटांचे आवाज, वेळीअवेळी केली जाणारी बांधकामे यामुळे हे पुनर्विकास प्रकल्प लगतच्या वसाहतींमधील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरू लागले आहेत. एकीकडे हे प्रकार सुरू असताना या प्रकल्पांना लागूनच असलेले जुन्या इमारतींना भेदून जाणाऱ्या उद्यानांच्या लहान जागा गिळंकृत करण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.

वाशी सेक्टर ९ येथील पुनर्विकास प्रकल्पात कंडोनियम क्रमांक ३ ते १८ या भूखंडातील मोकळ्या जागा तसेच बगीच्यांची फेररचना आणि परिसराचा नवा अभिन्यास तयार करण्यास महापालिकेने विकासकाला परवानगी दिली. अनेक पुनर्विकास प्रकल्पांची बांधकामे या नव्या रचनेशिवाय शक्य होत नसल्याचे बिल्डर आणि वास्तुविशारदकांचे म्हणणे होते. त्यामुळे इमारतींचे एकत्रीकरण करत असताना लगतच असलेल्या मोकळ्या जागाही मूळ प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्या. या जागा खऱ्या तर सार्वजनिक उपयोगाच्या होत्या. त्यामुळे बिल्डरांना अशा परवानग्या देणे योग्य होते का याविषयी सध्या वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान विभागाला उशिरा का होईना या मोकळया जागांची आठवण आली असून या जागा विकसित करून ताब्यात घ्या असे पत्र उद्यान विभागाने मालमत्ता विभागाला पाठविले आहे.

हेही वाचा…दोन कोटी रुपयांचे एमडी जप्त… नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई…

उद्यानांचा बेकायदा वापर?

वाशी सेक्टर नऊ परिसरात जुन्या उद्यानाच्या तीन जागा असून त्या अनुक्रमे ३८०. ८० चौ. मीटर, २१३०. ९० चौ. मीटर तसेच ४८४ चौ. मीटर अशा आकाराच्या आहेत. या जागा पुनर्विकास प्रकल्पाच्या अभिन्यासात वापरात आणल्या जात असताना महापालिकेच्या उद्यान विभागाने तसेच मालमत्ता विभागाने त्या हस्तांतरित करून घेण्यासाठी नेमके काय केले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या जागांचा बिल्डरांकडून अवैध पद्धतीने वापर होत असल्याची तक्रार वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी केला आहे. उद्यानांच्या या जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. असे असताना बांधकाम व्यावसायिकांनी या जागा बंदिस्त करून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवले आहेत, असा ठाकूर यांचा आरोप आहे.

वाशी सेक्टर ९ येथील पुनर्विकास प्रकल्पात गेलेल्या उद्यानांच्या मोकळ्या जागा व्यावसायिकांकडूनच विकसित करून नंतर घेतल्या जाणार आहेत. नगररचना विभागाने आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. काही ठिकाणी पुनर्विकास करताना या जागा अभिन्यासात घेणे आवश्यक होते. त्यामुळे कोणतीही मोकळी जागा बिल्डरांना आंदण दिल्याचा प्रश्नच ओला नाही. भोगवटा प्रमाणपत्र देताना सर्व बाबी विचारात घेतल्या जातील. – सोमनाथ केकाण, साहाय्यक संचालक, नगररचना विभाग, नमुंमपा

हेही वाचा…भाजपा कडून देशाच्या लोकशाही आणि संविधानाला धोका कायम, उरणच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

महापालिकेने सेक्टर ९ येथील गोदरेज विकासकाद्वारे सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पात पालिकेने उद्यानांच्या जागा यापूर्वीच का हस्तांतरित करून घेतल्या नाहीत. या जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे या जागा बिल्डरांना कशा देता येतील? महापालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्याने आता उद्यान विभाग मालमत्ता विभागाला या जागा हस्तांतरित करून घ्या असे सांगत आहे. हे सगळे प्रकरण त्यामुळे संशयास्पद आहे.– संदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai authorities struggle to reclaim encroached park spaces amidst redevelopment projects in vashi psg
Show comments