नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात सरकारी इमारत आवारातच सर्वाधिक कचरा
नवी मुंबई: स्वच्छ भारत अभियानात अनेक वर्षांपासून बक्षीस पटकावणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात सरकारी इमारत आवारातच अस्वच्छता दिसून येत आहे. त्यामुळे आगामी स्वच्छ भारत अभियानात शासकीय इमारत आवारात जास्त लक्ष द्यावे लागणार असल्याची चर्चा घनकचरा विभागात सुरु आहे. स्वच्छ भारत अभियानाचे वारे वाहू लागले असून त्यानिमित्ताने तयारीला सुरवात झाली आहे. प्रत्यक्षात आम्ही कायमच स्वच्छता ठेवतो असे घनकचरा विभाग छातीठोक पणे सांगत असतो. मात्र स्पर्धा निकाल जाहीर झाल्यावर स्वच्छ नवी मुंबईला काहीशी शिथिलता येते हे उघड सत्य आहे. शहरात आजही सर्वत्र त्यामानाने चांगली स्वच्छता निश्चित आढळून येते असे दिसून येत असले तरी सरकारी कार्यालय असणारे सिडको तसेच मनपाचेच विभाग कार्यालय, परिसरात कोपर्या कोपर्यात घाणीचे साम्राज्य असते. यात खास करून राडा रोडा हमखास आढळतो. हा राडा रोडा नूतनीकरण वा काही पडझड झाल्याने पडला असल्याचे सांगितले जात असले तरी महोनोंमहिने तसाच पडून राहतो तो उचलण्यास अधिकारीच उदासीनता दाखवतात असे निदान सिडको कार्यालय आवारातील परिस्थिती आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: मैदान वाचविण्यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे विरोधात आमरण उपोषणाचा इशारा
नवी मुंबई बसणाऱ्या सिडकोच्या सीबीडी येथील मुख्य कार्यालय आवारातच मोठ्या प्रमाणात राडा रोडा अनेक महिन्यापासून पडून आहे. आपणच वसवलेल्या शहराची स्वच्छते कडे सिडकोचे कानाडोळा करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. सिडको आवारात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील प्रवेश द्वाराच्या डाव्या बाजूला हा राडा रोडा अनेक महिन्यापासून पडला असून राडा रोडा ज्या गोंयांत ठेवण्यात आला आहे त्या गोण्याहि जीर्ण होऊन त्यातून राडा रोडा बाहेर पडत आहे. पार्किंगच्या जागेत पडलेल्या या राडा रोडा मुळे गाडी पार्किंगला जागा नसल्याने अनेकांना कार्यालयाबाहेर गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यावर येथे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्या सोडून देण्यात येतात मात्र सिडको वा बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या गाडी मालकावर मात्र कारवाईला सामोरे जावे लागते. अशी माहिती प्रणिती शहा या महिलेने आपबीती व्यक्त केली तर शहर वसवणाऱ्या सिडको कार्यालयातच पार्किंगला जागा नियोजन नसणे हे मोठे दुर्दैव आहे अशी खंत कामानिमित्त सिडकोत आलेले प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केली.
नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने राडा रोडा पडला आहे. अनेक महिन्यापासून पडला असेल तर चौकशी करून योग्य ती पाऊले उचलली जातील.
-प्रिया रातांबे (जनसंपर्क अधिकारी सिडको)
शासकीय कार्यालय असो वा खाजगी इमारत त्या आवारात कचरा राडारोडा अशा पद्धतीने अनेक महिन्यापासून पडला असेल तर त्यांना नोटीस देण्यात येते. सिडको बाबत पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल
– बाबासाहेब राजळे ( उपायुक्त घनकचरा विभाग )