नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या बेलापूर येथील मुख्यालयाच्या कुंपणावर नवी मुंबई जिल्हा युवक कॉंग्रेसने झळकवलेला ‘तो’ फलक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या फलकावर ‘सिडकोचा एन्काऊंटर’ असा मथळा लिहून ऐरोली येथील ७० एकर जमिनीचा मालक कोण असे लिहून प्रवाशांचे लक्ष कॉंग्रेसने वेधले आहे. या फलकावर ऐरोली येथील सेक्टर १० ए येथील ७० एकर जमीन कोणाची असे प्रश्नार्थिक लिहून बड्या उद्योगपतीची की सिडकोची असे शब्दकोडेसुद्धा दर्शविले आहे. बड्या उद्योगपतीला जमीन मोफत देण्याच्या प्रकारामुळे कॉंग्रेस पक्षाचे युवक आक्रमक झाले असून जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी सिडको भवन येथे याविषयी फलकबाजी करुन लक्ष वेधले आहे.
नवी मुंबई सध्या अनेक फलकांसाठी चर्चेत येत आहे. त्यापैकी पहिला फलक नवी मुंबईत रस्त्यांशेजारी आणि विविध चौकात अनेक ठिकाणी लावण्यात आला. फलक ‘तो येतोय ताकद दाखविण्यासाठी’ अशा आशयाने झळकविण्यात आला आहे. नवी मुंबईतील घराणेशाहीला ही ताकद दाखविण्यासाठी तो येतोय या मथळ्याने हे फलक लावले आहेत. राजकीय वर्तुळात नवीन येणाऱ्या नेत्याची सावली या फलकात दाखविण्यात आली असली तरी त्याचे छायाचित्र व नाव लपविण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील भूमिपूत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तो नेता कोण अशी चर्चा नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरु आहे.
हेही वाचा – नवी मुंबई, पनवेल उरण मतदारसंघात संशयास्पद ८५ हजार दुबार मतदार
अजूनतरी कोणत्याही राजकीय पक्षांनी या संदर्भात दावा केला नाही. दुसरा फलक हा पनवेलमधील स्थानिक भूमिपूत्र असलेल्या एका व्यापाऱ्याने महागडी मोटार खरेदी केल्याने अभिनंदनासाठी फलक झळकवला आहे. त्यानंतर तीसरा फलक नवी मुंबई जिल्हा युवक कॉंग्रेसने बेलापूर येथील सिडको भवनासमोरील रस्त्यांवर झळकवला आहे. ऐरोली येथील जमीन बड्या उद्योगपतीला देण्याच्या वादग्रस्त विषयावर हा फलक लावण्यात आला आहे. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ऐरोली येथील ७० एकर जमीन एकत्रित विल्हेवाट लावण्यासाठी पहिल्यांदा ऐरोली येथील जागेवर नेमके कोणता जागतिक टाऊनशीपचा प्रकल्प येणार, त्यामुळे सिडको आणि नवी मुंबईचा कसा लाभ होईल याचे पुनर्सादरीकरण विस्तृतपणे करण्याची सूचना अध्यक्ष शिरसाट यांनी सिडको अधिकाऱ्यांना केली. या सादरीकरणानंतरसुद्धा नवी मुंबईतील राजकीय पक्षांचे प्रतिष्ठित नेते, पत्रकार, पर्यावरण तज्ज्ञ व ज्येष्ठ नगररचनाकार यांची मते जाणून घेतल्यानंतरच याविषयी निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सिडको अध्यक्ष शिरसाट यांनी मांडली होती.