नवी मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आतापासूनच राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील १२ माजी नगरसेवक मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्याकाही महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि भाजप नेते वनमंत्री गणेश नाईक यांच्यात उघड संघर्ष सुरू आहे. शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार भरवून नाईक यांनी या संघर्षाचे रणशिंग फुंकले. या पार्श्वभूमीवर उद्या, वाशी येथे जाहीर मेळावा घेत शिंदे यांनीही पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आगामी नवी मुंबईची मोहीम आक्रमकपणे हाती घेण्याचे संकेत दिले आहेत.

मंगळवारी सायंकाळी विष्णुदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात वाशीतील वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड, सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, रंगनाथ औटी, भारती कोळी, अविनाश लाड, प्रणाली लाड, काशिनाथ पवार, रतन मांडणे, अंकुश सोनावणे, शुभांगी सोनावणे हे माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यापैकी बहुसंख्य माजी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील असून यांच्यापाठोपाठ काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही खिंडार पडणार आहे. पक्ष प्रवेशाचा हा मोठा सोहळा आयोजित करत शिंदे यांनी महाविकास आघाडीला खिंडार पाडले असले तरी खरे आव्हान भाजपचे स्थानिक मंत्री गणेश नाईक यांनाच देण्यात आल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास मंत्रीपद आल्यापासून नाईक आणि त्यांच्यात विस्तवदेखील जात नाही. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना नवी मुंबईतही ते म्हणतील ती पूर्व दिशा असा कारभार होता. त्यामुळे गणेश नाईक कमालीचे अस्वस्थ आहेत. शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास, सिडको या विभागांवर टीका करण्याची एकही संधी नाईक सोडत नसल्याचे चित्र आहे. गेल्या अडीच वर्षांत नवी मुंबईची लूट करण्यात आल्याची टीकाही नाईक यांनी केली आहे. ठाणे शहरात जनता दरबार भरवून या शहरात फक्त कमळ अशी घोषणाही मध्यंतरी नाईक यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईत पक्ष प्रवेशाचा रतीब मांडत शिंदे यांनी नाईक यांना एकप्रकारे आव्हान केल्याचे चित्र उभे आहे.

महाविकास आघाडीत मोठी बंडाळी

विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे महाविकास आघाडीतून रिंगणात उतरल्याने शहरात या तीन पक्षांची एकजूट दिसून आली होती. संदीप यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाचीही मोट बांधल्याने त्यावेळी महाविकास आघाडीत एकजूट दिसून आली होती. संदीप यांच्या पराभवामुळे मात्र महाविकास आघाडीला गळती लागली आहे. गणेश नाईक यांच्याकडे मंत्रीपद आल्याने संदीप यांचाही ओढा सध्या भाजपकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला शहरात कोणी वालीच उरले नसल्यासारखे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी पक्षात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला. असे असताना मंगळवारी होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने या पक्षात मोठी फूट पडत आहे.