नवी मुंबई : महापालिका निवडणुकांचे बिगुल नजीकच्या भविष्यात कधीही वाजू शकते, याची पुरेपूर जाण ठेवूनच यंदाचा नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर करवाढीची घोषणा कोणत्याच राजकीय पक्षाला परवडणारी नसल्याने यंदाचा अर्थसंकल्पही कोणतीही करवाढ नसलेलाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला २०२४-२५ चा अर्थसंकल्प तत्कालिन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी गेल्यावर्षी सादर केला होता. गेल्यावर्षी ४९५० कोटी जमा ४९४७.३० कोटी खर्चाचा व २ कोटी ७० लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प ५ हजार कोटीचा टप्पा पार करणार का याची नवी मुंबईकरांना उत्सुकता आहे. येत्या २० फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प सादर होईल. राज्याचे वनमंत्री व नवी मुंबई शहरावर सातत्याने राजकीय वर्चस्व असलेले गणेश नाईक यांची ‘कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प’ ही घोषणा यावेळीही कायम राहण्याची दाट शक्यता आहे. शिवाय गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाप्रमाणे काही ठाराविक नवे प्रकल्प वगळता गतवर्षीच्या जुन्याच अर्थसंकल्पाला नवी झळाळी मिळणार असल्याचे चित्र आहे.
हा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांना भौतिक व नागरी सुविधा, चांगल्या आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा देणारा असेल. मोरबे धरण परिसरात होणारा सोलार प्रकल्प, उर्वरित रस्ते व चौक काँक्रीटीकरण यासारख्या चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामे निश्चित करण्यात येतील, अशी चर्चा आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या अनेक जुन्या प्रकल्पांनाच पूर्ण करण्याचे उदिष्ट या अर्थसंकल्पातही पाहायला मिळणार आहे. सीबीएसई तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढ अपेक्षित आहे. पायभूत सुविधांवरही अधिक खर्च केला जाणार असून शहरात पार्किंग, तसेच पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करण्याकडे अधिक भर दिला जाणार आहे.
चौकट-
अतिरिक्त पाणी स्रोतांसाठी भरीव तरतूद
नवी मुंबई महापालिकेच्या या आर्थिक वर्षाच्या अंदाजामध्ये नागरी सुविधा तसेच आरोग्य व शिक्षणासह शहरात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने उपायोजना करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.तसेच शहरात वाढ होणारे पुनर्विकासाचे प्रकल्प, आगामी काळात शहराची वाढणारी लोकसंख्या यांच्यादृष्टीने दीर्घकालिन पाण्याचा स्रोत निर्माण करण्यासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाविषयी आढावा बैठका सुरु असून आगामी अर्थसंकल्पात कोणकोणत्या बाबींचा समावेश असले याबाबत आयुक्त स्तरावर विचारविनिमय सुरु असून अर्थसंकल्प ५ हजार कोटींचा टप्पा पार करेल का याबाबत पालिका आयुक्तच अंतिम निर्णय घेतील. सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी,नवी मुंबई महापालिका