बांधकाम क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात आलेली आर्थिक मंदी आणि स्वत:च्या अपयशाचे खापर सिडकोवर फोडून नवी मुंबईतील काही विकासक मोकळे होत असल्याचे राज कंदारी यांच्या आत्महत्येच्या निमित्ताने दिसून येत आहे. त्यामुळे कंदारी यांच्या अंत्ययात्रेत दंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याच्या काही विकासकांच्या योजनेला सुज्ञ विकासकांनी स्पष्ट नकार दिला. कंदारी यांच्या डायरीत सिडको अधिकाऱ्यांची स्पष्ट नावे नसल्याने कंदारी यांच्या मृत्यूचे राजकारण करणे काही विकासकांना पसंत पडले नाही.
राज कंदारी यांनी तीन दिवसांपूर्वी परवानाधारक शस्त्राने डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली. कंदारी गेले अनेक दिवस वैफल्यग्रस्त जीवन जगत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पनवेल, उरण, चेंबूर येथे सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना न मिळणारी मंजुरी आणि त्यामुळे विकली न जाणारी घरे व गाळे यामुळे ते तणावाखाली होते.
त्यात त्यांची ढासळलेली प्रकृतीही कारणीभूत असून त्यांनी काही दिवसांपासून मालमत्ता विकण्यास प्राधान्य दिले होते. जीवन कसे जगावे याबाबत कंदारी यांनी आपल्या डायरीत तीन पाने लिहून ठेवली असून सिडकोवा इतर शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल अवाक्षर नाही. त्यामुळे कंदारी यांनी केलेली आत्महत्या हे आर्थिक व आरोग्यामुळे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पनवेल येथे कंदारी यांच्या स्वराज्य डेव्हलपर्सच्या वतीने एक एकर जमिनीवरील गृहनिर्माण प्रकल्पाचा प्रस्ताव सिडकोत सादर केला गेला होता, पण परवानगी मिळण्याअगोदरच त्या ठिकाणी बेकायदा बांधकाम केले गेले होते. जमीन बिगरशेती न केल्याने सिडको या प्रकल्पाला परवानगी देत नव्हती. त्यामुळे कंदारी यांनी आत्महत्या केल्याचा प्रचार काही विकासक करीत असून कंदारींच्या आत्महत्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिडकोने मागील तीन वर्षांत २५१ प्रस्तावांपैकी २९ प्रस्तावांना मंजुरी दिली असून अपुऱ्या कागदपत्रांमुळे काही परवानग्या थांबविण्यात आलेल्या आहेत.
ठाण्यातील विकासक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी त्यांना त्रास देणाऱ्या नगरसेवक, अधिकाऱ्यांची नावे खासगी डायरीत लिहून ठेवली होती. यात त्यांना देण्यात येणाऱ्या रकमेचा उल्लेख होता. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. परमार यांचे प्रकरण कंदारी यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न काही विकासकांनी केला. त्यामुळे नैना प्रकल्पात मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांचे गेल्या दोन दिवसांत धाबे दणाणले होते. सिडकोने या प्रकरणात तात्काळ खुलासा केला, पण कंदारी यांच्या डायरीत अशी नावे नसल्याने या अधिकाऱ्यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.