नवी मुंबई : आजच्या काळात विविध कारणांवरून वाद होऊन त्यातून पुढे घटस्फोटाचा पर्याय अनेकजण निवडत असल्याचे दिसून येते. मात्र, नवी मुंबईतील ६० वर्षे सर्व परिस्थितीला सामोरे जात, जीवन जगणाऱ्या दाम्पत्याचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. समाजातील कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था टिकली पाहिजे, हा संदेश समाजापर्यंत पोहचवा यासाठी नवी मुंबईतील तरूण आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सध्याच्या युगात भौतिक सुखापेक्षा सुखी कुटुंब ही गरज भासू लागली आहे. संसार सांभाळत असताना होणारे मतभेद, वादविवाद यामुळे अनेक नाती तुटली जातात. मतभेदांमुळे नात तोडून वेगळे राहण्यास सुरूवात होते. मात्र, सर्व परिस्थितीशी लढत सुखी जीवन जगणाऱ्या नवी मुंबईतील सानपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सिताराम पाटील आणि पार्वती पांडुरंग पाटील यांच्या विवाहपूर्तीच्या हिरक महोत्सवी सोहळा नुकताच पार पडला. यशस्वी सहजीवनाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या या दाम्पत्याच्या माध्यमातून समाजातील विवाह संस्था टिकली पाहिजे, समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, आणि कुटुंब व्यवस्था टिकून राहावी हा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला. या सोहळ्यात पांडुरंग पाटील आणि पार्वती पाटील यांची धान्याने, शालेय वह्यांनी तुळा करण्यात आली. तुळा केलेले धान्य वाशीतील आरोग्यदूत म्हणून कार्य करणाऱ्या कचरावेचक महिलांना देण्यात आले. तर तुळा केलेल्या वह्या त्रंबकेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
या सोहळ्यास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. आजपासून तरुण -तरुणींचे आणि नवविवाहितांचे जीवन सुरक्षित होईल. तसेच विवाहित जोडप्यांच्या घरातील कलूशीत वातावरण बदलण्यास मदत होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदिप नाईक, नवी मुंबई महापालिका माजी महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. अविनाश कुलकर्णी, ह.भ.प गुरुवर्य निलेश कुलकर्णी, युवा नेते निशांत भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, सुनंदा पाटील, समाजसेवक विजय वाळुंज हे उपस्थित होते.
या सोहळ्यावेळी संस्थेचे सदस्य हर्षित भगत यांनी घटस्फोटीत दाम्पत्यांच्या मुलांच्या जीवनातील वास्तव आणि मानसिकता स्पष्ट केली. या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ऍड. मनोज महाराणा यांनी केले. तर सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले.