नवी मुंबई : सिडको मंडळाने खारकोपर येथील गृहप्रकल्पामधील भूखंड क्रमांक ३ येथे तळमजला आणि त्यावर सहा मजले असे बहुमजली वाहनतळ अवघ्या ४२ दिवसांत उभारला. १ लाख ४३ हजार बांधिव क्षेत्राच्या वाहनतळावर ३६५ वाहने उभी राहू शकतील.
खारकोपर येथील गृहसंकुलातील रहिवाशांना या वाहनतळात वाहने उभी करण्यासाठी ही इमारत बांधण्यात आली. ही इमारत वेगाने बांधली असली तरी या इमारतीचा बांधकामाचा गुणवत्ता दर्जा जपून हे वाहनतळ उभारल्याची माहिती शुक्रवारी वाहनतळाच्या उद्घाटनप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर यात केला आहे. प्लिंथ टू टेरेस आरसीसी प्रकारातील हे बांधकाम आहे.
‘मिशन ४५’ अंतर्गत करण्यात आलेले सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे बांधकाम हे विकासातील नवीन मानदंड स्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, जे आपल्या शहरांचे भविष्य अधिक उज्वल घडवण्यासाठी योगदान देते.- विजय सिंघल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको