पनवेल : सिडको महामंडळ नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांलगत महागृहनिर्माण योजनेतून जुईनगर, खांदेश्वर, खारघर, मानसरोवर व इतर ठिकाणी शेकडो घरांचे बांधकाम करत आहे. घरांचे बांधकाम पूर्ण झालेले नसतानाही स्वातंत्र्यदिनी या घरांची सोडत निघेल, असे लघुसंदेश समाजमाध्यमांवर पसरविण्यात येत आहेत. खासकरून विविध राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांकडून याचा गैरवापर केला जात असून यात अनेकांची फसवणूक होण्याचा संभव आहे.

नागरिकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्ष कार्यकर्ते तसेच संबंधित व्यावसायिक या फसव्या जाहिरातील गैरवापर करीत आहेत. नवी मुंबई सिडको सोडत २०२४ असा मथळा असलेली माहिती एखाद्या अधिकृत शासकीय अर्जाप्रमाणे असलेली जाहिरात समाजमाध्यमात पसरवली जात आहे. या योजनेमध्ये हक्काचे घर मिळाल्यास रेल्वे स्थानकालगत घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याच स्वप्नांचा आधार घेऊन काही व्यावसायिकांनी समाजमाध्यमांवर संबंधित महागृहनिर्माण योजनेत घर मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रियेत सहकार्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. सिडकोच्या जनसंपर्क विभागाने सोडतीची तारीख निश्चित केली नसल्याने अशा भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा…एपीएमसी’तील कचरा समस्या मार्गी, १२५ कोटींच्या मंजूर निधीतून घनकचरा व्यवस्थापन करण्याचा प्रशासनाचा निर्णय

सिडकोच्या जनसंपर्क विभागाकडे जेवढी माहिती नाही त्याहून अधिक माहिती संबंधित व्यावसायिकांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून रेल्वे स्थानकांलगत घरे मिळविण्यासाठी इच्छुकांचे लक्ष वेधले आहे. या खोट्या जाहिरातीमध्ये संबंधित योजना सिडको मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने घरांची सोडत काढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सोडत खुली झाल्यानंतर पहिल्या तासात पाच ते सहा हजार घरांची नोंदणी होणार असल्याने अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत असे जाहिरातीमध्ये म्हटले आहे.

सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेत ३५ लाख रुपयांचे वन बीएचके घर खरेदी करता येईल. यासाठी अर्जदाराला प्रधानमंत्री आवास योजनेत नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच या योजनेत अडीच लाख रुपयांची अनुदान आणि मुद्रांक शुल्कामध्ये अडीच लाखांची सवलत मिळेल असेही म्हटले आहे. इतर इच्छुकांना ४२ लाख वन बीएचके घरासाठी आणि टूबीएचके घरासाठी ६५ लाख रुपयांचा दर या जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आला आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : मोरबे धरणामधील जलसाठा ९० टक्क्यांवर

जाहिरात करणाऱ्या व्यावसायिकाने सिडकोच्या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी सुरू झाल्यावर आवडीचे घर निवडून अर्जदाराने अर्ज नोंदणी केल्यानंतर सिडकोला आरक्षित कोट्यासाठी ७५ हजार रुपये अनामत रक्कम आणि सामान्य कोट्यासाठी दीड लाख रुपयांची अनामत रक्कम तीन दिवसांत जमा करावी लागणार आहे.

हेही वाचा…उरण : गॅस शवदाहिनीची प्रतीक्षाच, नगर परिषदेचा ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचा दावा

सिडकोने घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी इच्छुकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन यापूर्वीच केले आहे. सिडकोने अद्याप कोणतीही जाहिरात दिलेली नाही. किंवा कोणतीही तारीख सोडत प्रक्रियेसाठी निश्चित केलेली नाही. समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या जाहिरातीविरोधात तक्रार करण्यासाठी सिडकोच्या दक्षता कार्यालयात नागरिक तक्रार करू शकतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी सिडकोच्या पणन विभागाचे बेलापूर रेल्वे स्थानक येथील निवारा केंद्राशी संपर्क साधू शकतील. – प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ

Story img Loader