लोकसत्ता टीम
पनवेल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी नवी मुंबईत येत आहेत. मोदींचे चाहते त्यांना भेटण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मोदी ज्या मार्गावरुन सभेस्थळी पोहचणार आहेत अशा वहाळ ते उलवा या मार्गावरील सेवा रस्त्यावर दुपारपासून मोदी यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. मोदी हे सव्वाचार वाजण्याच्या सूमारास नवी मुंबईत दाखल होतील. मात्र मोदींची पहिली भेट आपल्यालाच मिळावी यासाठी नवी मुंबईतील भाजपचे कार्यकर्ते तसेच मुहायुतीच्या कार्यकर्त्यांनी सेवा रस्त्यावर दुपारपासून ठाण मांडले आहे.
नवी मुंबई शहरात विविध जाती धर्माचे नागरिक राहतात. कॉस्मोपॉलिटन शहरातील नागरिकांनी मोदींना या शहराचे वैशिष्ट्य दाखविण्यासाठी विविध मंडपामध्ये त्यांचा पारंपारीक पेहराव घालून मोदींचे लक्ष वेधण्यासाठी पारंपारीक वाद्यांचा गजर येथे केला आहे. अवघे काही मिनिटे शिल्लक असल्याने पंतप्रधान मोदी हे कधीही येऊ शकतील यासाठी वहाळ गाव ते उलवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या सभास्थळापर्यंत मारवाडी, गुजराती, मराठी, पश्चिम महाराष्ट्र, शीख अशा विविध समाजातील नागरिक ढोलांच्या गजरामध्ये मोदींचे स्वागत केले आहे.
आणखी वाचा-अटल सेतूच्या शुभारंभाला रामाचा नारा, विकास प्रकल्पातून महायुतीची हिंदुत्वाची पेरणी
चाहते रस्त्यावर येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख लावला आहे. तसेच नवी मुंबईसह विविध जिल्ह्यातून येथे अतिरीक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे आल्यावर त्यांना शहर स्वच्छत दिसावे यासाठी नवी मुंबई पालिकेच्या सफाई विभागाने रस्त्यावर पाण्याचा फवारा आणि तांत्रिक झाडुने रस्ते स्वच्छ केली जात आहेत. या तांत्रिक यंत्राचा लाभ रस्त्याशेजारी बसलेल्या मोदींच्या चाहत्यांना मिळत आहे. उनाचा चटका आणि त्यामध्ये पाण्याच्या फवा-याचे थेंब या मोदी चाहत्यांच्या अंगावर उडत असल्याने उन्हाच्या चटक्यापासून काहीअंशी दिलासा नागरिकांना मिळाला आहे.