नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख शहरांमध्ये पुरेशा नियोजनाअभावी पार्किंग व्यवस्थेचा अक्षरश: विचका होत असल्याचे चित्र असतानाच नवी मुंबई महापालिकेने मात्र शहरातील पार्किंग कोंडीवर उतारा शोधण्यासाठी उशिरा का होईना कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने एक जानेवारी रोजी जाहीर केलेल्या नव्या नियमांमध्ये रहिवासी इमारती, बंगले तसेच मोठया बैठ्या घरांसाठी मुबलक पार्किंगचे नियोजन असेल अशाच पद्धतीने आखणी केली आहे. यासंबंधीच्या फेरबदलांवर राज्य सरकारचा निर्णय अंतिम असणार आहे.
वाशीतील सामाजिक कार्यकर्ते आणि नियोजन क्षेत्रातील अभ्यासक संदीप ठाकूर यांनी नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्थेसंबंधीची एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मध्यंतरी नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनास दिले होते. महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी यासंबंधी कोकण विभागाचे तत्कालीन सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. भोपळे यांच्या समितीने नवी मुंबईत माफक आणि पुरेशा पार्किंग व्यवस्थेसंबंधी काही महत्त्वाच्या शिफारशी आयुक्त डाॅ. शिंदे यांना सादर केले होते. या शिफारशींच्या अनुषंगाने महापालिकेने एक जानेवारी २०२५ रोजी यासंबंधीची नवी नियमावली जाहीर केली असून यामध्ये नव्या पार्किंग व्यवस्थेत महत्त्वाचे बदल सुचविले आहेत.
दरम्यान, नवी मुंबईतील पार्किंग व्यवस्थेसंबंधी नवे नियम आखण्याची जबाबदारी कोकण विभागाचे नगरविकास विभागाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र पुढे त्यांची रस्ते विकास महामंडळाच्या संचालकपदी बदली झाली. यानंतरही या समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय आयुक्त कैलास शिंदे यांनी घेतला होता. या निर्णयामुळे समितीच्या शिफारशी आणि नियमांची आखणी वेळेवर करणे शक्य झाले.
पार्किंगमधील नवे नियम कसे असतील?
- नवी मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार यापुढे १५०० चौरस फुटांपेक्षा अधिक घराचा आकार असलेल्या एक घरामागे बिल्डरांना किमान २ चारचाकी वाहनांसाठी पार्किंग ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय यापेक्षा मोठे घर उभारणाऱ्या बिल्डरांना १५०० चौरस फुटांवरील प्रत्येक ५०० चौरस फुटांवरील घरासाठी आणखी एक पार्किग व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय एक जागा दुचाकीसाठी ठेवणेही बंधनकारक राहील.
- ८०० ते १५०० चौरस फुटांच्या प्रत्येक एका घरासाठी २ चारचाकी तर एका दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय एकूण घरांच्या बांधणीच्या तुलनेत पाच टक्के अधिक व्हिजिटर पार्किंगची वस्वस्थाही बिल्डरला करावी लागणार आहे.
- ६०० ते ८०० चौरस फुटांच्या प्रत्येकी दोन घरांमागे तीन चारचाकी वाहने तर दोन दुचाकी वाहनांची व्यवस्था करणे या नव्या नियमानुसार बंधनकारक करण्यात आले आहे.
- ४०० ते ६०० चौरस फुटांच्या प्रत्येकी दोन घरांमागे २.५० या प्रमाणात पार्किंग काढण्याचा नियम आखण्यात आला असून २ दुचाकी उभ्या राहतील अशी व्यवस्थाही बिल्डरांना करावी लागणार आहे.
- ३०० ते ४०० चौरस फुटांच्या प्रत्येकी दोन घरांमागे २ चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्यांसाठी पार्किंग काढावे लागणार असून ३०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या एका घरासाठी किमान एक चारचाकी गाडीचे तर दोन दुचाकी उभ्या राहतील अशी व्यवस्था करावी लागणार आहे.
हे ही वाचा… परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
व्हिजिटर्स पार्किंग बंधनकारक
शहरात यापुढे कोणत्याही आकाराच्या घरांची बांधणी करणाऱ्या बिल्डरांना एकूण घरांच्या तुलनेत ५ टक्के पार्किंग हे अभ्यांगतांसाठी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी घरांच्या आकारमानानुसार यासंबंधीचे निकष आखण्यात आले होते. हे निकष नव्या नियमांमध्ये बदलण्यात आले आहे. यासंबंधीचे नियम बदल करताना महापालिकेने नागरिकांच्या हरकती, सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर यासंबंधीचे धोरण राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे यांनी दिली.
यूडीसीपीआरमधील शिथिलता इतिहासजमा?
राज्य सरकारने २०२० मध्ये मंजूर केलेल्या एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीत (यूडीसीपीआर) प्रत्येक घरामागे पार्किंगचे नियम तुलनेने शिथिल करण्यात आले आहेत. नव्या यूडीसीपीआरमध्ये ३०० ते ४०० कार्पेट क्षेत्र असलेल्या दोन घरांमागे एक चारचाकी आणि एक दुचाकी उभी करण्याची व्यवस्था असावी असे नियम करण्यात आले आहेत. हाच नियम नवी मुंबईत लागू व्हावा यासाठी शहरातील बिल्डर आग्रही होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या समितीने ही शिथिलता इतिहासजमा करताना पुरेशा पार्किंग व्यवस्थेचा आग्रह धरल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई महापालिकेने नेमलेल्या समितीने पार्किंगसंबंधी जी नियमावली बनवली आहे त्यामुळे नवी मुंबई शहर हे निश्चितच राज्यातील सर्वाधिक पार्किंग व्यवस्था असलेले शहर ठरले आहे. नवी मुंबईतील संकुलांमधील पार्किंग व्यवस्था ही इतर शहरांच्या व्यवस्थेपेक्षा उत्तम आहे. नव्याने करण्यात आलेली आखणीही इतर शहरांच्या तुलनेत चांगली दिसत आहे. या व्यवस्थेची अंमलबजावणी उत्तम पद्धतीने होईल यासाठी महापालिकेने आता लक्ष देण्याची गरज आहे. – संदीप ठाकूर, याचिकाकर्ते