पालिका आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे क्रीडा विभागात आमूलाग्र बदल
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांमधील मैदाने अतिक्रमण त्याचबरोबर सुविधा नसल्याने वंचित राहली होती. आजवर राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पातळीवर शहराची लौकीकता वाढवणारे खेळांडू सुविधा नसल्याने मैदानांचा शोध घेत इतरत्र जात होते. मात्र पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारी १९ मैदाने नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आजवर ओस पडलेली शाळांचे मैदाने आता क्रिडा स्पर्धानी फुलणार आहे. या बाबतची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच यांचे काम सुरु होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६२ शाळांपैकी अनेक शाळांना मैदाने आहेत. मात्र त्या मैदानांवरचा वापर खेळाडू साठी न होता. इतर खासगी कामासाठी तसेच पडीक अवस्थेत असल्याने त्याचा दुरपयोग होत होता. महापालिकेच्या शाळांना असणारी मैदाने नेमकी कोणासाठी असा प्रश्न खेळाडू आणि नवी मुंबईतील क्रीडा प्रेमी नागरिकांनी उपस्थित केला होता. तर अनेकदा महापालिकेच्या माध्यामातून घेण्यात येणाऱ्या क्रिडा स्पर्धा वाशी येथील नवी मुंबई स्पोटर्स असोसिएशन आणि सीबीडी येथील पालिकेच्या राजीव गांधी मैदानावर घेण्यात येत होत्या. त्यामुळे शाळांचे मैदाने ओस पडली होती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून क्रीडा पट्टू घडवण्यासाठी मागील काही वर्षांपासून अनेक उपक्रम देखील राबवण्यात आले. त्यामुळे खो खो, कबड्डी, मॅरेथॉन, हॉलीबॉल, अशा मैदानी खळामध्ये खेळाडूनी नवी मुंबई शहराची लौकिकता वाढवली आहे. मात्र असे असताना केवळ सरावासाठी मैदानाचा वापर होत नसल्याने खासगी प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात शालेय खेळाडूना सराव करावा लागत होता. महापालिकेच्या माध्यमातून क्रिडा क्षेत्राला चालना देण्यासाठी वार्षिक स्पधार्, क्रिडा प्रशिक्षण , सुट्टीच्या कालावधीत समर कॅम्प, खेळाडूना क्रिडा शिष्यवृत्ती अशा सुविधा देण्यात येतात.
नवी मुंबई महानगरपािलकेच्या क्रीडा विभागाने सन २०१२ पासून नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील पालिका शाळांच्या मैदानावर खेळाडू साठी विशेष योजनांची तरतुद करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार सन २०१२ पासून त्याचा पाठपुरावा सुरु होऊन अर्थसंकल्पात केंद्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार ५ टक्के खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही मागणी पुर्णत्वास न आल्याने अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आर्थिक तरतुदीचा आढावा घेत मागील काही महिन्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या १९ शालेय मैदानांचा क्रिडा अधिकांऱ्याकडून तसेच अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांच्याकडून आढावा घेतला होता.
अनुभवी प्रशिक्षक मिळणार
महापालिकेच्या खेळांडूना मैदानाबरोबरच अनुभवी आणि नैपुण्यमिळवणारे मार्गदर्शक मिळावे यासाठी चार कबड्डी प्रशिक्षक, चार खो खो प्रशिक्षक, टेबल टेनिस व फुटबॉल प्रशिक्षक लवकरच नेमणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या क्रिडा धोरणाला चालना मिळणार असून खेळाडूना देखील त्याचा फायदा होणार आहे.
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण यांच्या निर्दशानुसार महापालिकेच्या शाळांची माहिती व क्रिडा विषयक धोरणांची तपशीलवार माहिती पाठवण्यात आली आहे. २०१२ पासून सातत्याने पालिकेकडे क्रिडा धोरणाविषयी पाठपुरावा केला आहे. आयुक्तांनी सकारात्मक भुमिका घेतली असून त्यावर लवकरच निर्णय होऊन नवी मुंबईतील खेळाडूंना दिलासा मिळेल.
– रेवप्पा गुरव, क्रीडा अधिकारी नमुंमपा