शहरातील गृहनिर्माण सोसायटींना ओला व सुका कचरा वर्गीकरण करून तो साठविण्यासाठी वाटण्यात आलेल्या कचराकुंडय़ांना लावण्यात आलेल्या आरएफआयडी (रेडिओ फ्रीक्वन्सी आयडेन्टिफिकेशन डिव्हाइस) तंत्रज्ञानामुळे पालिकेची या कुंडय़ावर करडी नजर ठेवण्यास मदत होत असून आतापर्यंत साठ ठिकाणच्या कचराकुंडय़ा उचलण्यात न आल्याची तक्रार कंत्राटदाराकडे करण्यात आली आहे.
अद्ययावत मॉलमधील दुकानात एखादी वस्तू दुकानाबाहेर आणल्यानंतर वाजणारी घंटा नवी मुंबई पालिकेने पहिल्यांदाच कचराकुंडीला लावण्याचा प्रयत्न केला आहे. हा देशातील पहिला प्रयोग मानला जात आहे.
नवी मुंबईतील घनकचरा वाहतुकीच्या कंत्राटाला मोठय़ा वादाची किनार असून काँग्रेसने दोन वर्षांपूर्वी या कंत्राटाची तक्रार केल्यामुळे या निविदेची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून शासनाने चौकशी केलेली आहे. त्यानंतर हे कंत्राट योग्य असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी सुमारे ५३ कोटींचे हे घनकचरा वाहतुकीचे काम देण्यात आले असून त्यात कचराकुंडय़ांना आरएफआयडी यंत्रणा लावण्याची अट घालण्यात आली होती. शहरात बारा हजार ५०० कचरा कुंडय़ा वितरित करण्यात आलेल्या असून त्यांना उचलण्याच्या जागी ह्य़ा आरएफआयडी यंत्रणेची चिप लावण्यात आलेल्या आहेत. हे काम कंत्राटदाराने काही दिवसांपूर्वी पूर्ण केले असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. सोसायटीतील कचराकुंडी उचलली की नाही, उचलली तर ती केव्हा उचलली, तिला उचलण्याची वेळ काय, याचा सर्व अहवाल या पद्धतीमुळे पालिकेच्या बेलापूर येथील मुख्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात नोंद केला जात आहे. त्यामुळे कचराकुंडय़ांची हालचाल टिपली जात आहे. जर्मनीच्या मोबा कंपनीची ही यंत्रणा आहे. पालिकेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीआरएस पद्धत लावली असल्याने त्यांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. ह्य़ामुळे शहरातील साफसफाई व वाहतूक चांगल्या प्रकारे होत असल्याचे आता दिसून येऊ लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा