समुद्रात जाणाऱ्या हातहोडय़ांची नोंदणीच नाही; मत्स्य विभागाचे दुर्लक्ष 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत जिथे मासेमारी केली जाते अशा खाडीकिनाऱ्यांवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून केवळ सिलिंडरवर चालणाऱ्या होडय़ांचीच नोंदणी केली जात आहे. हातहोडय़ांची नोंद केली जात नसल्यामुळे या होडय़ांतून मासेमारीसाठी जाणाऱ्यांच्या आणि एकंदर खाडीकिनाऱ्याच्याच सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हातहोडय़ांचीही नोंद केली जावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.

नवी मुंबई हे मूळ आगरी-कोळ्यांचे गाव आहे. या शहराला ऐरोली, घणसोलीपासून अगदी बेलापूर दिवाळेपर्यंत मोठा खाडीकिनारा लाभला आहे. शहरातील ५ हजारांहून अधिक लोक आजही हातहोडीतून मासेमारी करतात. र्मचट अ‍ॅक्ट १९५८ नुसार शहरातील हातहोडय़ांची नोंदणी करून कौल दिला जातो आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१नुसार नोंद करून परवानगी दिली जाते. नवी मुंबईतील मच्छीमारांकडे कौल आहे, परंतु हातहोडय़ांद्वारे समुद्रात जाणाऱ्यांची नोंद होत नाही. त्यामुळे  नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे मच्छीमार संकटात आल्यास बचावकार्यात अडथळे येऊ शकतात. दहशतवादी हल्ला झाल्यास आणि या बोटी ताब्यात घेऊन दशतवाद्यांनी नवी मुंबईत शिरकाव केल्यास त्यांचा पत्ता लागणेही कठीण होऊ शकते. त्यामुळे हातहोडय़ांचीही नोंदणी करण्यात यावी, अशी या मागणी होत आहे. याआधीही दहशतवाद्यांनी देशात शिरकाव करण्यासाठी समुद्र मार्गाचा अवलंब केला आहे.

खाडीकिनारी असलेल्या सुरक्षारक्षकांसाठीही कोणत्याही सोयी नाहीत. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. पोलिसांनी समुद्रकिनाऱ्याच्या रक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे अपेक्षित आहे, परंतु नवी मुंबईतील खाडीकिनारी पोलीस संरक्षणाचा पत्ता नाही. सुरक्षारक्षकांकडे विचारणा केली असता आपण केवळ सिलिंडर होडय़ांचीच नोंद करत असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्यविभाग सुरक्षा रक्षकांना सात महिन्यांत वेतनच मिळाले नसल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले.

कोकण किनारपट्टीवर ३०२ मासेमारी ठिकाणे असून त्यापैकी ९१ अतिसंवेदनशील आहेत. महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाने सुरक्षारक्षक नेमले आहेत. मासेमारीसाठी टोकन डायरी आहे. परंतु येथे हातहोडय़ांद्वारे समुद्रात जाणाऱ्यांची नोंदच होत नाही.

यासंदर्भात मत्स्यव्यवसाय आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. किनाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हातहोडय़ांतून कोणीही समुद्रात जाऊ-येऊ शकते. त्यामुळे मत्स्य विभाग, पोलीस, तटरक्षक दल अशा सर्वानीच समन्वयातून समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक होडीची नोंद घ्यायला हवी.

मनोज मेहेर, अध्यक्ष, कोलवाणी माता मित्र मंडळ

र्मचट कायद्याखाली हातहोडय़ांची नोंदणी करून कौल दिला असला तरी मासेमारी अधिनियम १९८१अन्वये मासेमारी करण्यासाठी हातहोडय़ांनाही परवानगी घेणे आवश्यक असते.

युवराज चौगुले, साहाय्यक आयुक्त, मत्स्य विभाग, पालघर

नवी मुंबईत मासेमारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. करावेतील अनेक रहिवासी मासेमारी करतात. नवी मुंबईतील मच्छीमारांना पालघर येथील मत्स्य विभागाकडून परवानगी व कौल दिला जातो. परंतु समुद्रात जाताना हातहोडय़ांचीही नोंद करणे गरजेचे आहे.

विनोद म्हात्रे, नगरसेवक, करावे गाव

नवी मुंबईतील सागरी सुरक्षेबाबत आम्ही सतर्क आहोत. मासेमारीसाठी जाणाऱ्या होडय़ांची नोंद केली जाते. या नोंदणीवर मत्स्य विभागाचे लक्ष असते. परंतु सागरी सुरक्षेविषयी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. शहराला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते.

राजेंद्र बनसोडे, उपायुक्त, विशेष शाखा