Navi Mumbai Crime : नवीन पनवेल भागात प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या केली आहे. जागृती असं या मुलीचं नाव आहे. ती २२ वर्षांची होती. तिचा प्रियकर निकेशने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निकेशला अटक केली आहे.
नेमकी काय घटना घडली?
निकेश आणि जागृती यांचं एकमेकांवर प्रेम होतं. तीन महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेक अप झालं होतं. आपली प्रेयसी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे असा संशय निकेशला होता, त्याच संशयातून त्याने तिची हत्या केली. नवीन पनवेल या ठिकाणी ही घटना घडली आहे. निकेशने जागृतीच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली, त्यानंतर तिला मारहाणही केली. एवढं करुनही तो थांबला नाही त्याने तिच्या गळ्यावर सपासप वार केले आणि तिला संपवलं. त्यानंतर निकेशने स्वतःवरही वार केले आणि आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निकेशला अटक केली.
पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते काय म्हणाले?
आम्हाला या हत्या प्रकरणाची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा आम्ही तातडीने निकेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजरही करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते यांनी माध्यमांना दिली.
पोलिसांनी आणखी काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकेश आणि जागृती हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जागृती ही २२ वर्षांची होती. तीन महिन्यांपूर्वी या दोघांचं ब्रेक अप झालं. या तीन महिन्यांच्या कालावधीत दोघांचा काही संपर्क नव्हता. जे काही घडलं ते ती मुलगी विसरली होती, तिने आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगण्यास सुरुवात केली होती. निकेश मात्र काहीही विसरला नाही. त्याने तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवस जागृतीला एका मुलाशी बोलताना निकेशने पाहिलं. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आहेत असा संशय निकेशला आला. त्यानंतर त्याने थेट जागृतीचं घर गाठलं आणि तिला जाब विचारण्यास सुरुवात केली. आधी त्याने तिला शिवीगाळ केली आणि मग मारहाणही केली. इतकं करुन तो थांबला नाही त्याने चाकू आणलाच होता याच चाकूने त्याने तिच्यावर वार केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावरुनही सुरु फिरवली आणि आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं ज्यामुळे त्याचा जीव वाचला. पोलिसांनी निकेशला अटक केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस आता पुढील तपास करत आहेत.