नवी मुंबई : येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून नागरिकांचा पर्यावरणपूरक मूर्ती खरेदीकडे कल वाढत आहे. पर्यावरणपूरक मुर्तींना मागणी वाढत असल्याने बाजारात आता शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती देखील दाखल झाल्या आहेत. या कागदी मूर्ती शाडू तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा अधिक उपयुक्त ठरत आहेत. मात्र यंदा लाल मातीच्या मूर्तींना गणेश भक्तांकडून नापसंती दर्शविली जात आहे.

गणेशोत्सव कालावधीत पीओपी गणेश मूर्ती व त्यामुळे पाण्याचे व तलावांचे होणारे प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पर्यावरण जनजागृती अधिक प्रबळ होत चालली आहे. गणेशोत्सवात पर्यावरण प्रेमी, प्रत्येक घटकांतून पर्यावरण प्रदूषण कसे रोखता येईल याची खबरदारी घेण्याकडे अधिक कटाक्ष असतो. त्यामुळे शहरात आता पीओपीला बगल देत नागरिक शाडूच्या मूर्तींना पसंती देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरण पूरक मूर्तींमध्ये शाडूच्या मूर्ती व्यतिरिक्त कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती बाजारात दाखल होत आहेत.

हेही वाचा : जपानलाही नवी मुंबईची ओढ! पालिकेच्या पर्यावरण प्रकल्पांना भेट

यामध्ये विविध रंगीबेरंगी, आकर्षक मूर्ती तयार केल्या जातात. या पर्यावरण पूरक मूर्ती पाण्यात लवकर विरघळतात त्यामुळे कागदी आणि लाल मातीच्या मुर्ती अधिक उपयुक्त ठरतात. मागील वर्षी लाल मातीच्या मूर्तीचा पर्यायही उपलब्ध झाला होता. मात्र या मूर्ती केवळ लाल माती आणि एका रंगात असतात. मागील वर्षी गणेशोत्सवात वेगळेपणा म्हणून या मूर्तींना मागणी होती. गणेशोत्सव म्हटलं की रंगीबेरंगी आकर्षक गणेश मूर्ती डोळ्यांसमोर उभ्या राहतात. लालमातीच्या मूर्तीमध्ये एकच रंग उपलब्ध असल्याने यंदा त्याला मागणीच नाही. यंदा गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात ३०% ते ४०% वाढ झाली आहे, त्यामुळे गणेशमूर्तीमध्ये १०% वाढ झाली आहे.

हेही वाचा : “येत्या शंभर दिवसात एपीएमसी पुनर्विकास कृती आराखडा तयार करू”, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन

मागील काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्त्यांची मागणी वाढत आहे. करोना महामारीनंतर अधिक कल वाढला आहे. शाडूच्या मूर्ती बरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या आणि लाल मातीच्या मूर्तीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र यंदा लाल मातीच्या मूर्तींना अजिबात मागणी नाही. अद्याप एक ही मूर्ती बुक झाली नाही. यामध्ये एकच रंग असल्याने बहुधा नापसंती दर्शविली जात आहे. परंतु पुढील कालावधीत आणखीन रंगात उपलब्ध झाली तर नक्कीच मागणी असेल अशी अपेक्षा आहे, असे नमस्कार श्री मूर्ती केंद्र वाशी येथील मयुरेश लोटलीकर यांनी म्हटले आहे.

Story img Loader