नवी मुंबई : पावसाळा तोंडावर असतानाही अद्याप चौकांचे काँक्रिटीकरण व पामबीच मार्गावरील मायक्रोसर्फेसिंगची कामे सुरूच आहेत. चौकांच्या काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात त्या ठिकाणी खड्डे पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालेसफाईची कामे ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका करत असताना शहरात विविध विकासकामांची शहरात अभियंता विभागाकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू असून जवळजवळ ७५० विकासकामे सुरु आहेत. त्यातील रस्ते व चौक काँक्रिटीकरणाची कामे अर्धवट आहेत. ज्या ठिकाणी कामे अर्धवट आहेत, त्या ठिकाणी काँक्रिटीकरण थांबवून डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे चौकातील अर्धवट कामांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या कामांचा खर्च कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्धवट कामांमुळे पावसाळ्यात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : रस्त्यावर एकावर चाकू हल्ला, बार आणि लॉजमध्ये घुसून टोळक्याचा धुडगूस, पाच जणांवर गुन्हा दाखल

विविध चौकांचे काँक्रिटीकरण तसेच पामबीच मार्गावर मायक्रोसर्फेसिंग, नालेदुरुस्ती, गटारे यांसह पालिकेच्या विविध इमारती यांची कामे सुरू आहेत. रस्ते दुरुस्ती, मल:निसारण वाहिन्या टाकण्यासाठीची खोदकामे यासह विविध कामे केली जात असून ती तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. पामबीच मार्गावर मायक्रोसर्फेसिंगची कामे करण्यात येत आहेत. पावसाळा सुरु होण्याची स्थिती असताना अद्याप खोदकामे सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरातील चौकांच्या कामाची स्थिती

शहरातील एकूण चौक – १३३

काँक्रीटीकरण पूर्ण – ७९

अद्याप कामे सुरु – १७

काँक्रिटीकरण न केलेले – ३७

इंडियम रोड कौन्सिलने देशभरात १५ मेनंतर डांबरीकरणाची कामे करू नयेत असा नियम केला असतानाही शासकीय आस्थापना तसेच नवी मुंबई महापालिका याकडे दुर्लक्ष करते. तसेच पालिकेच्या या प्रकाराला सजग नवी मुंबईकर विरोध करत असताना बिनधास्तपणे कामे सुरू आहेत. चौक काँक्रिटीकरणाच्या अर्धवट कामामुळे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात अर्धवट कामाच्या ठिकाणच्या चौकामध्ये खड्डे पडणारच. त्यामुळे याचा खर्च कोण करणार की पालिकेची तिजोरी ठेकेदारांना खुलीच असणार असा प्रश्न आहे. – सुधीर दाणी, नवी मुंबई</p>

हेही वाचा – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल महापालिकेच्या ४८ उद्यानात ११०० वृक्षांचे रोपण

पामबीच मार्गावरची मायक्रोसर्फेसिंगची कामे पुढील दोन तीन दिवसांत पूर्ण होतील. चौक काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीसाठी अडचण येऊ नये त्यासाठी ठेकेदाराकडूनच डांबरीकरण करवून घेण्यात येत आहे. त्याचा खर्च ठेकेदारच करणार आहे. पावसाळ्यानंतर कार्यादेशाप्रमाणे चौकांच्या काँक्रिटीकरणाचे काम ठेकेदाराकडून पूर्ण करुन घेण्यात येणार आहे. – शिरीष आरदवाड, शहर अभियंता

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai development works continue in the city even after the deadline asphalting time due to partial concreting of squares ssb