नवी मुंबई – बेस्टची डबल डेकर विद्युत बस मुबंईत दाखल झाली असून, त्यापाठोपाठ आता एनएमएमटीची डबल डेकर विद्युत बस मे महिन्यात नवी मुंबईत दाखल होणार आहे. २५-३५ डबल डेकर विद्युत बस घेण्याचे नियोजन असून पहिल्या टप्यात ११ विद्युत डबल डेकर बस दाखल होणार असून, यामध्ये एक बस पर्यटकांकरिता, तर उर्वरित १० बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
दिवसेंदिवस डिझेल, पेट्रोलचे वाढते दर यामुळे नवी मुंबई परिवहन तोट्यात आहे. त्यामुळे नवी मुंबई परिवहनाच्या सक्षमीकरणावर भर दिला जात असून, बस आगारांचे वाणिज्य संकुल, तसेच इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी पर्यावरण पुरक अशा विद्युत बसचा उपयोग केला जात आहे. केंद्र शासनाच्या फेम १ आणि फेम २ योजनेअंतर्गत नवी मुंबई परिवहनाच्या ताफ्यात १८० बस आहेत. मुबंईत सुरुवातीपासूनच डबल डेकर बस आहे. आता बेस्टच्या ताफ्यातदेखील विद्युत डबल डेकर बस दाखल झाली असून, प्रवाशांकरिता सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : १७ व्या डी.वाय. पाटील टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, १६ संघांचा सहभाग
हेही वाचा – नवी मुंबई : पाळणाघरात १६ महिन्यांच्या बाळाला मारहाण, पालकांची तक्रार
नवी मुंबईतही डबल डेकर बस आकर्षित ठरणार असून, ती नवी मुंबईकरांच्या सेवेत कधी दाखल होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. नवी मुंबईकरांना डबल देकरची उत्सुकता लागली आहे. नवी मुंबईची डबल डेकर मे महिन्यात दाखल होणार, अशी महिती परिवहनाकडून देण्यात येत आहे. ही डबल डेकर बस लांब पल्याच्या मार्गावर, तसेच जास्त प्रवासी संख्या असलेल्या विभागात सुरू होणार आहे. प्राथमिक स्तरावर ११ बस सुरू करण्यात येणार असून यातील एक बस नवी मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करण्यासाठी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.