नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर मधील सेक्टर १५ मधील एका पडीक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एका १९ वर्षीय तरुणीची पडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. ही घटना कळताच एनआरआय पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. युवतीचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मनपा प्रथम संदर्भ रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ही युवती आपल्या दोन मित्रांच्या समवेत पार्टी करण्यास या पडीक इमारतीत गेली होती. तिथे मद्य प्राशन केले.
रात्रीच्या अंधारात युवतीच्या लक्षात न आल्याने ती डक मधून तोल जाऊन थेट खाली पडली त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले की, सदर युवती मित्रांच्या समवेत या पडीक इमारतीत पार्टी करण्यास गेली होती. तिच्या दोन्ही मित्रांची चौकशी सुरू आहे. तूर्तास अकस्मात मृत्यू म्हणून घटनेची नोंद करण्यात आली आहे. मात्र हा घातपात असल्याचे चौकशीत समोर आल्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. मद्य प्राशन बाबत ठोस माहिती वैद्यकीय अहवालात समोर येईल.