ठाणे बेलापूर मार्गावर गोठीवली-तळवली या ठिकाणीची सिग्नल यंत्रणा शनिवार पासून नादुरुस्त आहे. नियंत्रका वरील लाल पिवळा आणि हिरवा असे सर्वच दिवे लागल्याने वाहन चालक गोंधळून जात असून परिणामी वाहतूक कोंडी वारंवार होत आहे. या बाबत वाहतूक पोलिसांनीही मनपाच्या विद्युत विभागाला कल्पना दिली मात्र अद्याप दुरुस्ती नाहीच.नवी मुंबईतील सर्वात व्यस्त मार्गापैकी ठाणे बेलापूर हा एक मार्ग आहे. शहरांतर्गत मार्ग असला तरी एखाद्या महामार्गा प्रमाणे प्रशस्त मार्ग असल्याने रस्ता तसा सुसाट आहे.
मात्र सध्या घणसोली येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या ठिकाणी वाहतूक अत्यंत धीमी आहे . मात्र या ठिकाणाहून पुढे मार्गस्त होताना गोठीवली तळवली गावातून सदर महामार्गाला जोडणाऱ्या चौकात पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याला कारण ठरले आहे ते मनपाच्या विद्युत विभागाचा ढिसाळ कारभार. उड्डाणपुलाखाली असेलेल्या या चौकात फारशी रहदारी नसते. ठाणे बेलापूर मार्गावर जाणे वा तेथून गोठीवली तळवली गावात प्रवेश करणारी वाहने या ठिकाणी एकत्रित येतात. वाहतूक शिस्तीत होण्यासाठी येथे सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र तीन दिवसापासून सदर सिग्नल मध्ये बिघाड झाला आहे. तिन्ही दिवे कायम सुरु असल्याने थांबा, वाट पहावे कि मार्गस्थ व्हावे हे वाहन चालकांना कळत नाही.
हेही वाचा : डंपरचे ब्रेक फेल झाल्यामुळे २ जण गंभीर जखमी तर ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
त्यात थांबले तर मागून सलग हॉर्न ऐकून घ्यावे लागतात अशात वाहने पुढे नेली जातात. हीच परिस्थिती सर्व बाजूंची असल्याने वाहनांची संख्या वाढतच वाहतूक कोंडी वारंवार होते. येथे तुरळक वाहतूक होते व सिग्नला प्रणाली असल्याने वाहतूक पोलीस या ठिकाणी थांबत नाहीत. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यास विलंब होतो. अनेकदा कोणीतरी वाहन चालकाच गाडीतून उतरून वाहतूक नियंत्रित करतो मात्र स्वतःची गाडी या कोंडीतून निघाली कि तोही निघून जातो. अशी माहिती येथून कार्यालयासाठी नियमित जाणारे निखील म्हात्रे यांनी दिली. तर आम्ही या बाबत मनपाला कळवले मात्र दुरुस्ती अद्याप नाहीच. अशी माहिती एका वाहतूक पोलिसाने दिली. या विषयी मनपाच्या समंधीत अधिकार्याने फोनवर प्रतिसाद दिला नाही. मात्र कार्यालयात संपर्क केला असता लवकरच दुरुस्ती करू असे उत्तर मिळाले.