नवी मुंबई : नवी मुंबई क्षेत्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या वाहनांची नोंदणी सातत्याने वाढत असून शहरात मागील वर्षात ३३ हजार ३६६ वाहनांची नोंद झाली होती त्यात वाढ होऊन यंदा आतापर्यंत ३५ हजार ९७९ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा २ हजार ६१३ जास्त वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरावरील वाहनांचा बोजा सातत्याने वाढत असून वाहनतळाचा प्रश्न वर्षानुवर्ष अधिक जटील होत चालला आहे. संपूर्ण शहरात पार्किंगची डोकेदुखी वाढतच चालली असून वाढत्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीचा मात्र सातत्याने खेळखंडोबा उडत असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग तसेच अंतर्गत रस्ते यांचे जाळे असले तरी नवी मुंबई हे मुंबई शहराचे प्रवेशद्वारावर असलेले शहर आहे. अंतर्गत वाहतुकीबरोबरच शहरात असलेली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ तसेच जेएनपीटी बंदर, होऊ घातलेला विमानतळ तसेच अटल सेतूमुळे वाहनांची वाढती संख्या याचा परिणाम शहरातील रस्ते वाहतुकीवर होऊ लागला आहे. शहरात पार्किंगच्या जागा कमी असताना वाढत्या वाहन संख्येमुळे शहराच्या सर्वच उपनगरांत दिवसेंदिवस दुतर्फा पार्किंग केलेले दिसून येते.

हेही वाचा – नव्या इमल्यांसाठी जुन्यांना हादरे : वाशी, सीवूड्स भागांत खोदकामासाठी स्फोट, ‘धरणीकंपा’मुळे परिसरातील इमारतींना धोका

परिवहन कार्यालयात चारचाकी वाहने, मीटर टॅक्सी, रिक्षा, बस, शालेय बस, खासगी सेवा वाहने, रुग्णवाहिका, ट्रक, टँकर, खाजगी चारचाकी, सार्वजनिक तीनचाकी वाहने, ट्रेलर्स, अन्य शासकीय वाहने अशा विविध प्रकारच्या वाहनांची नोंदणी केली जाते. नवी मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात ट्रेलरची वाहतूक जेएनपीटीकडे होते. शहरात मोटारसायकलची नोंदणी गेल्या वर्षीपेक्षा कमी असून मीटर टॅक्सी रिक्षा, तसेच मोठे ट्रेलर यांची नोंदणी वाढली आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंग समस्या अधिक जटील

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३५ हजार ९७९ नव्या वाहनांची नोंदणी गेल्या वर्षीपेक्षा २६१६ जास्त वाहनांची नोंद, रिक्षा, मीटर टॅक्सी, ट्रेलर, टँकरची संख्या वाढल्याने पार्किंग समस्या अधिक गंभीर ठरेल.

हेही वाचा – नवी मुंबई : पाण्याच्या टाकीचे प्लास्टर कोसळले, नव्या इमारतींच्या ब्लास्टिंगमुळे रहिवासी चिंतेत, पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

वाहनांची नोंदणी सातत्याने वाढत आहे. १ एप्रिल २०२३ पासून मार्चपर्यंत ३५,९७९ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत यात काही प्रमाणात वाढ होणारच आहे. उपप्रादेशिक कार्यालयाकडून नोंदणी नसलेल्या वाहनांवर नियमानुसार कार्यवाही केली जाते. – हेमांगिनी पाटील, उपप्रदेशिक अधिकारी, नवी मुंबई

नोंदणी झालेली वाहनसंख्या

वर्ष – नवी वाहने नोंदणी

२०२१- २२ – २२,२९२

२०२२-२३ – २७,२८९

२०२३-२४ – ३५,९७९

वाहने वर्ष – २०२२-२३ वर्ष २०२३-२४

मीटर टॅक्सी – ९७७ – १७२०

रिक्षा – १०३४ – १९९८

टँकर – ३६० – ३८८

ट्रेलर – ८७ – ५९७

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai due to the increasing number of vehicles the parking problem will become more complicated ssb