नवी मुंबई : विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवसच आधी सिडकोने २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेला सुरुवात केली. आतापर्यंत ६८ हजार अर्जदारांनी या सोडतीसाठी नोंदणी केली आहे. सोडतीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र यांसारखी सरकारी कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्जदारांना सरकारी कार्यालयांत जावे लागत आहे. महसूल विभागाचे निम्म्याहून अधिक कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र असल्याने कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्जदारांना आणखी मुदतीची गरज भासत आहे. सिडकोने या सोडतीची अर्जनोंदणीची अखेरची मुदत ११ नोव्हेंबर ही जाहीर केल्याने इच्छुक ग्राहकांकडून आणखी महिनाभर तरी अर्जनोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी सिडको दरबारी होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या महागृहनिर्माण योजनेच्या नागरिक प्रतीक्षेत होते. यावेळच्या सिडको सोडतीमधील घरे बाजारभावापेक्षा १० टक्के कमी दराने मिळतील, अशी घोषणा सिडको मंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली होती. प्रत्यक्षात या सोडतीमधील घरांच्या किमती किती असतील हे सिडकोने अजूनही जाहीर केलेले नाही. तरी स्वस्त घरे वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वे स्थानक आणि खांदेश्वर रेल्वेस्थानक येथे मिळतील, या अपेक्षेने ६८ हजार नागरिकांनी त्यांची अर्जनोंदणी केली आहे.
हेही वाचा – नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी राखीव घरे आहेत. इच्छुक नागरिक सिडकोच्या https:.cidcohomes.com या संकेतस्थळावर त्यांची अर्जनोंदणी करू शकतील. सिडको मंडळाने या वेळी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेत अर्जनोंदणी करतानाच अर्जदाराने जात प्रवर्गाचा दाखला, आर्थिक उत्पन्न श्रेणी, अधिवास प्रमाणपत्र अशी कागदपत्रे जमा केल्यावरच पुढील प्रक्रियेत अर्जदाराला सहभाग घेता येईल असे नियम केले. त्यामुळे घराची किंमत माहिती नसली तरी सिडकोची घरे बाजारभावापेक्षा स्वस्त मिळणार असल्याने ६८ हजार नागरिकांनी अर्जनोंदणी केली असून एक लाखांहून अधिक अर्जदार सहभाग घेतील असा विश्वास सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ११ डिसेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज नोंदणीसाठी मुदत दिली जाईल यासाठी सिडकोत हालचाली सुरू आहेत. अजूनही अर्जनोंदणीसाठी पाच दिवस शिल्लक असल्याने ११ नोव्हेंबरनंतर मुदतवाढ मिळेल का या प्रतीक्षेत सामान्य नागरिक आहेत. याबाबत सिडकोची प्रतिक्रियेसाठी जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
अर्जनोंदणी करताना सरकारी विविध कागदपत्रे अर्ज नोंदणीबरोबरच जोडावीत अशी मुख्य अट असल्याने ती मिळविण्यासाठी दिलेली मुदत पुरेशी नाही. निवडणूक कामात अधिकारी गुंतल्याने कागदपत्रे मिळविण्यासाठी धावाधाव होत आहे. त्यामुळे सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी अर्जनोंदणीची मुदतवाढ देणे गरजेचे आहे. – अरविंद पाटील, सामाजिक कार्यकर्ता, वाशी