नवी मुंबई : नवी मुंबईला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करणारी वाहिनी बेलापूर सीबीडी येथे फुटल्याने शनिवार पासून शहरात पाणी पुरवठा झाला नाही. ऐरोली नेरुळ वाशी कोपरखैरणे, सानपाडा अघोषित पाणी बाणी सारखी परिस्थिती आहे. पाण्याची वाहिनी दुरुस्ती कधी पर्यंत होईल पाणी पुरवठा कधी सुरळीत होईल अशी कुठलीही सूचना न दिल्याने शहरात पाण्याचा खडखडाट झाला आहे. 

मोरबे धरण ९० टक्के पेक्षा अधिक भरले असून आता पाणी टंचाई होणार नाही. त्यामुळे शहरात आठवड्यातून दोन ऐवजी एक दिवस पाणी पुरवठा बंद केला जाईल अशी घोषणा मनपा पाणीपुरवठा विभागाने दोन आठवड्यापूर्वी केली . मात्र पाणीपुरवठा नियोजन व्यवस्थित नसल्याने आजही अनेक ठिकाणी पाणी पुरेसे सोडले जात नाही. शनिवारी सीबीडी बेलापूर येथील आग्रोळी गावानजीक पाण्याची वाहिनी फुटली. त्यामुळे शनिवार पासून अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद आहे तो रविवारी सुद्धा तीच परिस्थिती होती. वाहिनीचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे आज सांगण्यात आले.

हेही वाचा…ग्राहकांना देशी सफरचंदांची प्रतीक्षा

 शनिवारी जर पाण्याची वाहिनी फुटली तर शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी पाणी येणार नाही. पाणी पुरवठा रविवारी संध्याकाळ पर्यंत सुरळीत होईल अशी कुठलीही सूचना पाणी पुरवठा विभागाने देण्याची तसदी घेतली नाही. या बाबत जेव्हा विचारणा करण्यात आली त्यावेळी हि परिस्थिती समोर आली. त्यामुळे रविवारी अनेक घरात पाण्याचा पूर्णपणे खडखडाट होता. अशी माहिती वसंत वाईकर या कोपरखैरणे सेक्टर १० येथील रहिवाशाने दिली. तसेच शनिवारी पाणी नाही रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. अशा वेळी पूर्वकल्पना मिळाली तर काही तरी सोय करता येते आमचे हॉटेल असून आता सकाळी टँकर मागवावे लागले. अशी माहिती उपेंद्र गुप्ता या वाशीतील एका हॉटेल चालकाने दिली. सीबीडी बेलापूर येथे पाणी वाहिनी फुटली रात्रीतून दुरुस्ती करण्यात आली. मात्र पाणी नोड नुसार टप्प्या टप्प्याने देण्यात येत असल्याने पूर्ण शहरात संध्याकाळ पर्यंत सर्वत्र पाणी येईल असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

हेही वाचा…नवी मुंबई : पालिका शाळांच्या वेळेत सोमवारपासून बदल

याबाबत पाणी पुरवठा मुख्य अभियंता अरविंद शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी शट डाऊन असल्याचे सुरवातीला सांगितले. मात्र पाणी वाहिनी फुटली अशी माहिती त्यांना दिल्यावर मात्र त्यांनी त्याला दुजोरा दिला. व रविवारी संध्याकाळ पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले.