नवी मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांमुळे यंदा दहीहंडी आयोजनाला भक्कम राजकीय व आर्थिक पाठबळ मिळाले आहे. परिणामी यंदा दहीहंडी उत्सवाचा जोर शहरात अधिक पाहायला मिळणार आहे. नवी मुंबईत दिघ्यापासून ते बेलापूरपर्यंत लाखमोलाच्या अनेक दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा नवी मुंबई शहरात ५९ सार्वजनिक दहीहंडी उत्सवांना परवानगी देण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
नवी मुंबईत वाशी, ऐरोली, घणसोली, सानपाडा कोपरखैरणे, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर या विभागासह शहराच्या विविध उपनगरात हा उत्सव
आनंदाने साजरा केला जाणार आहे. यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. नवी मुंबई शहरात दहीहंडी उत्सवाची परंपरा आहे. दहीहंडी उत्सवाच्या अगोदर चोरहंडी उत्सवही साजरा केला जातो. या चोरहंडी उत्सवाचे आयोजन विविध विभागात होते. ऐरोली विभागात शिवसनेच्या शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांच्या वतीने सुनील चौगुले स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यामातून अकरा लाखांचे विविध पारितोषिक देण्यात येणार असून ऐरोलीमधील सर्वात मोठी दहीहंडी आहे. ऐरोली सेक्टर १५ येथी गणेश इच्छापूर्ती मंदिराजवळ दहीहंडी उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात वाद्यावृदांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच गौतमी पाटील व सई ताम्हणकर या कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.
हेही वाचा – नवी मुंबईत आता पर्यटन विकास आराखडा
सानपाडा विभागात भाजपचे पांडुरंग आमले व साई भक्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने सानपाडा सेक्टर ८ येथील हुतात्मा बाबू गेणू मैदान येथे हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यासह आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे तसेच भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले तसेच विजय नाहटा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विठ्ठल मोरे सोमनाथ वासकर यासह विविध पदाधिकाऱ्यांमार्फतही विविध दहीहंडी मंडळांना प्रोत्साहित केले आहे.
नवी मुंबई शहरात ५९ पेक्षा अधिक सार्वजनिक दहीहंडी उत्सवांना परवानगी देण्यात आली असून शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी चोख पोलीस व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. – पंकज डहाणे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
हेही वाचा – नवी मुंबईत आता पर्यटन विकास आराखडा
उरण, उलव्यात १५० हून अधिक दहीहंड्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा होणारा आहे. त्यामुळे उरण व उलवे नोडमध्ये खासगी आणि सार्वजनिक मिळून एकूण १५० पेक्षा अधिक दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. विविध राजकीय नेत्यांनी लाखोंची बक्षिसे लावली आहेत.
उरणमध्ये आमदार महेश बालदी मित्रमंडळाने पाच थरांसाठी ७ हजार तर सात थरांसाठी ११ हजार रुपये देण्यात येणार आहेत. शहरातील उरण नगर परिषदेच्या नाना धर्माधिकारी विद्यालयाच्या प्रांगणात हे थर लावण्यात येणार आहेत. ठाकरे गटाच्या वतीने थरांसाठी ३ ते ६ हजार रुपयांचे बक्षीस आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने ५५ हजारांची हंडी जाहीर केली आहे. याच बरोबरीने उलवे नोडमध्ये भाजपने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ लाख रुपयांचे बक्षिसे असलेली सर्वात मोठी व त्या खालोखाल काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी ५ लाखांची हंडी जाहीर केली आहे. शेतकरी कामगार पक्षानेही दहीहंडी जाहीर केली आहे.
पोलीस ठाणेनिहाय हंडी
– वाशी – ०३
– एपीएमसी – ११
– कोपरखैरणे – ०२
– रबाळे – ०९
– रबाळे एमआयडीसी – ०५
– तुर्भे – ०३
– सानपाडा – ०२
– नेरुळ – १०
– सीबीडी – ०६
– एनआरआय – ०८
– एकूण – ५९