नवी मुंबई : नेरुळ येथे नो पार्किंग जागेत पार्क केलेल्या गाडीला केवळ जॅमर लावून टोईंगची साडेचार हजार वसुली केल्या प्रकरणी मनपाच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे पेपरलेस कारभाराचा गाजावाजा करणाऱ्या मनपामध्ये बेकायदा पार्किंग दंडाच्या पावत्या मात्र छापील दिल्या जात असून पैसेही रोखीने देण्याचा आग्रह केला जात आहे. दिलेल्या छापील पावतीवर पेनाने अतिरिक्त लिहिले जात असल्याने या कारभारावर भुवया उंचावल्या जात आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंटरनॅशनल मास्टर लीगचे सामने खेळवले जात आहेत. त्यामुळे २२, २४ आणि २७ फेब्रुवारीला येथील सेवा मार्ग अन्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत आहे. मंगळवारी यातील दुसरा सामना झाला. त्यावेळीही अन्य वाहतूक किंवा पार्किंग साठी सेवा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे येथे नेहमी पार्क होणारी वाहने अन्यत्र पार्क केली गेली. ज्यात काही नो पार्किंग झोनमध्येही पार्क केली गेली. त्यामुळे नेरुळ विभाग कार्यालयाने कार्यतत्परता दाखवत अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र ही कारवाई करताना बेकायदा दंड वसुली केल्याने अनेक वाहन चालकांनी अगोदर पोलीस ठाणे आणि नंतर नेरुळ विभाग कार्यालयात धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी अरेरावी सहन करावी लागली. शेवटी नेरुळ मनपा सहाय्यक आयुक्त यांच्याकडे ही तक्रार गेली मात्र तेथेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे अनेक वाहन चालकांनी सांगितले.

नेमका वाद काय?

क्रिकेट सामने होत असल्याने सेवा मार्गावर पार्किंग करता येत नाही त्यामुळे अशा गाड्यांसाठी अन्यत्र पार्किंग देणे क्रमप्राप्त आहे. मात्र मनपा प्रशासनाने त्याचा काहीही विचार केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने अनेकांनी ‘नो पार्किंग’ मध्ये गाड्या पार्क केल्या. या गाड्यांना जॅमर लावण्यात आले. त्याची दंड वसुली करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र टोईंग न करता टोईंगची अतिरिक्त साडेचार हजार वसुली का करण्यात आली, यावर वाद झाला. तसेच दंडाचे पैसे रोखीने देण्याची सक्ती करण्यात आली, असे एका विद्यार्थाने सांगितले.

वसुली नो पार्किंगची, पावत्या नळ जोडणीच्या

नो पार्किंग दंड भरलेली पावती ही नळ जोडणीची देण्यात आली. त्यावर नो पार्किंग दंड असे काहीही लिहण्यात आले नव्हते. त्याबाबत एका वाहन चालकाने विचारणा केली असता टोईंग शुल्क ४ हजार ५०० जॅमर चार्जेस ५०० एकूण ५ हजार असे लिहून देण्यात आले आहे. याबाबत नेरुळ विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत जावडेकर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

नेमका काय प्रकार आहे हे माझ्या समोर आलेले नाही. त्यामुळे चौकशी करून योग्य ती पाऊले उचलली जातील. – भागवत डोईफोडे, उपायुक्त, नवी मुंबई मनपा

Story img Loader